शिवसेना शिंदे गटातील १२ आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत परत येणार-अँड असीम सरोदे यांचे भविष्य
*निर्भय बनो या माध्यमातून अँड असीम सरोदे यांच्यासह इतर मंडळींनी चंद्रपूर इथं सभा घेतली. त्या सभेत सरोदेंनी शिवसेना शिंदे गटातील १२ आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत परत येणार असल्याचा दावा केला.या सभेत सरोदेंनी थेट या १२ जणांच्या नावाची यादीच वाचून दाखवली. परंतु यातील २ आमदार हे आधीपासूनच उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं दिसून येते. त्यातील एका आमदाराचे नाव सरोदेंनी भलतेच घेतले. असीम सरोदे यांनी चंद्रपूरच्या सभेत म्हटलं की, शिंदेंकडे गेलेले १२ आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येण्याचा प्रयत्न करतायेत. त्यात पालघरचे श्रीनिवास वनगा, चोपड्याच्या लता सोनवणे, अलिबागचे महेंद्र दळवी, मागाठणेचे प्रकाश सुर्वे, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर, एरंडोलचे चिमणराव पाटील, बाळापूरचे नितीनकुमार तळे, औरंगाबाद मध्यचे प्रदीप जैस्वाल, कन्नडचे उदयसिंह राजपूत, कोरेगावचे महेश शिंदे, राधानगरीचे प्रकाश आबिटकर ही नावे सांगितली. हे १२ जण पुन्हा उद्धव ठाकरेंकडे शरण येण्यास तयार आहेत. कारण त्यांच्या लक्षात आलंय आपलं या माणसासोबत भविष्य नाही. ज्याला ठाणे जिल्ह्याबाहेर ओळख नाही असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली. परंतु असीम सरोदेंनी भाषणात ११ आमदारांची नावे घेत १२ जण पुन्हा ठाकरेंकडे परतणार असा दावा केला. या वाचून दाखवलेल्या आमदारांच्या यादीतील २ आमदार हे आधीपासूनच उद्धव ठाकरेंसोबत आहेत हे निदर्शनास येते. छत्रपती संभाजीनगर येथील कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरेंकडेच आहे.तर दुसरे बाळापूरचे आमदार नितीनकुमार तळे असं सरोदेंनी नाव वाचलं, ते नितीनकुमार तळे हे नितीन देशमुख नावाने प्रसिद्ध आहेत. जे शिवसेना फुटीवेळी शिंदे गटासोबत सूरत गुवाहाटीला गेले होते. मात्र त्यांना फसवून नेण्यात आले असा आरोप त्यांनी केला होता. नितीन देशमुख हे फुटीपासूनच उद्धव ठाकरेंसोबत आहेत. मात्र सरोदेंनी या आमदाराचे नावही त्याच यादीत जोडले.www.konkantoday.com