
वाळू उत्खननावर महसूलचे लक्ष,दोघांवर कारवाई
_दाभोळखाडीत अनधिकृतपणे वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. करंबवणेसह खेड हद्दीतील बहिरवली परिसरात सक्शनपंपाने वाळू काढली जात आहे. शासकीय वाळूचे दर वाढल्यानंतर ग्राहकांनी ही वाळू खरेदी करण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे विनापरवाना वाळू उत्खननाकडे पावले वळू लागली आहेत. शासकीय वाळूची विक्री होत नसल्यामुळे महसूल आणि खनिकर्म विभागाकडून कारवाईवर भर देण्यास सुरवात केली आहे. दोन्ही विभागाची पथके कारवाईसाठी सरसावली आहेत. त्यांनी केलेल्या पाहणीत काही बंद सक्शन पंप आढळले तर तीन डंपर अनधिकृत वाळू वाहतूक करताना सापडले. ते जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी दोघांकडून दंडात्मक रक्कम वसूल केली; मात्र अद्याप या वाळूच्या लिलावाचा मुहूर्त काढण्यात आलेला नाही. अनधिकृत वाळूविक्रीसाठी आतापर्यंत जप्त केलेल्या वाहनांमध्ये डंपरचा वापर होतो. या आधी काही कारवाईवेळी नंबर नसलेल्या डंपरचा वापर करण्यात आला होता; मात्र दंडात्मक रक्कम दहापट आकारली जात असल्यामुळे फारसे कोणी धाडस करत नाहीत. महसूलकडून काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत अनधिकृत वाळू विक्रीप्रकरणी तीन डंपर जप्त केले. त्यामध्ये दोन डंपर कालुस्ते आणि एक डंपर गोवळकोट येथील आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरीही पुढील प्रक्रिया सुरू आहे. जप्त केलेली वाळू अद्याप महसूल विभागाच्या ताब्यात आहे. या वाळूच्या लिलावाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. लवकरच या सर्व वाळूचा लिलाव करून पैसे वसूल केले जाणार आहेत. www.konkantoday.com