
गणपतीपुळे परिसरात होणार्या नवरा माझा नवसाचा- २ च्या चित्रिकरणासाठी परवानगीची प्रतीक्षा
प्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांचा नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा दुसरा भाव लवकरच येतोय. या चित्रपटाचा काही भाग गणपतीपुळे येथे चित्रित होणार आहे. यासाठी सचिन पिळगावकर यांनी चित्रिकरणाला परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकार्यांची भेट घेतली होती. मात्र जिल्हा प्रशासनाकडूनच चित्रीकरणासाठी अजूनही परवानगी मिळालेली नसल्याचे समजते.अभिनेते आणि निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर हे तब्बल १९ वर्षानंतर नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा दुसरा भाग नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटातील काही भाग रत्नागिरी रेल्वेस्थानक आणि गणपतीपुळे मंदिर परिसरात चित्रित होणार आहे. यासाठी सचिन पिळगावकर यांनी फेब्रुवारी महिन्यात चित्रिकरणाच्या परवानगीसाठी स्वतः जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी गणपतीपुळे येथे जावून श्रींचे दर्शनही घेतले होते. मात्र १५ दिवसानंतरही जिल्हा पोलीस विभागाकडून सुरक्षेसंदर्भात कोणताच अहवाल न मिळाल्याने जिल्हा प्रशासनाकडून चित्रिकरणासाठी परवानगी दिलेली नाही, असे सांगण्यात आले.या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली असगर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार असे दिग्गज कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. www.konkantoday.com