
आरएचपी फाउंडेशनतर्फे मुफीद टेमकरला दिली व्हीलचेअर
रत्नागिरी : मुफीद उस्मानअली टेमकर (वय १८, रा. मु. पो. किर्तीनगर, रत्नागिरी) याला रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे व्हिलचेअर देण्यात आली. याबद्दल त्याच्या आई-वडिलांनी व कुटुंबियांनी फाउंडेशनचे विशेष आभार मानले.मुफीद इयत्ता पाचवीत म्हणजे दहा वर्षाचा असताना त्याला तापात इंजेक्शन दिल्याने कमरेखालून दोन्ही पायांना पोलिओ झाला. त्याला चालता येत नाही. खूप औषधोपचार केले पण काही फरक पडला नाही. मुफीदला ऐकायलाही कमी येते. आई साराबी उस्मानअली टेमकर त्याला आंघोळ घालणे, जेवण भरवणे अशी सर्व कामे करते. वडील उस्मानअली मुसा टेमकर हेल्पर म्हणुन कुवेतमध्ये काम करतात.मुफीदचे वय, वजन वाढू लागल्याने आता त्याचे सर्वकाही करणे आईला शक्य होत नाहीये. त्याची आधीची व्हीलचेअर तुटली होती. त्यावरुन तो पडल्याने बेडवरच पडून असतो. त्यांचे एक नातेवाईक खुदबुद्दीन मुकादम यांनी त्यांना रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनची माहिती दिली. मुफीदच्या पालकांनी आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांना भेटुन सर्व परिस्थिती सांगितली. मुफीदसाठी व्हीलचेअर मिळण्यासाठी विनंती केली. सादिक नाकाडे यांनी त्यांची सर्व परिस्थिती जाणून घेऊन संस्थेतर्फे नवीन व्हिलचेअर दिली.त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष सादीक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, प्रिया बेर्डे आदी तसेच साराबी टेमकर, आलामीन मुकादम, खुदबुद्दीन मुकादम, आरमान मुकादम उपस्थित होते. आता व्हीलचेअरवरुन मुफीदला बाहेर घेऊन जाणे, दवाखान्यात नेणे सहज शक्य झाल्याने त्याच्या आईचा शारीरिक त्रास खूप कमी झाला. मुफीदच्या चेहर्यावर आनंद पाहायला मिळाला. व्हीलचेअर मिळाल्याने त्यांनी आरएचपी फाउंडेशनचे मनापासुन आभार मानले.www.konkantoday.com