
रावणवध म्हणजे रामाने विश्वावर मिळविलेला विजय – आफळेबुवा
रत्नागिरी : तब्बल ८७ दिवस चाललेल्या युद्धानंतर रामाने अखिल विश्वात दहशत असलेल्या रावणाचा वध करून मिळविलेला विजय म्हणजे लंकेवरचा, अयोध्येचा आणि केवळ भारताचाच नव्हे, तर विश्वावर मिळविलेला विजय होता. तोच आपण साजरा करत आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले. आले रामराज्य अर्थात राममंदिर ते राष्ट्रमंदिर या संकल्पनेवर गीतरामायणातील गीतांचे गायन आणि त्यावरील विवेचन अशा स्वरूपाचा पाच दिवसांचा कार्यक्रम येथे सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात पार पडला. अखेरच्या, सहाव्या दिवशी आफळेबुवांचे लळिताचे कीर्तन झाले. या कीर्तनाने सहा दिवसांच्या कीर्तनसंध्या महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी निरूपण करताना बुवांनी लळिताचे कीर्तन ही संकल्पना त्यांनी आधी स्पष्ट केली. त्यानंतर राम-रावण युद्धातील उभय पक्षांकडून लढले गेलेले डावपेच, त्यासाठी योजल्या गेलेल्या क्लृप्त्या आणि अखेर दुष्ट प्रवृत्तींवर सुष्ट प्रवृत्तींनी केलेली मात याचे रसाळ वर्णन बुवांनी केले. रामायणाचा बोध घेऊन नव्या पिढीने सशक्त, चांगल्या विचारांचा प्रसार करावा, शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावे, मुलांवर सुसंस्कार करून उद्याची उत्तम पिढी घडवावी, असे आवाहनही बुवांनी केले.मध्यंतरात सत्कार समारंभ झाला. कीर्तनसंध्या महोत्सवाच्या रंगमंचावर मागील बाजूला भव्य राममंदिर आणि रामप्रतिमा साकारणारे राहुल कळंबटे आणि अयोध्येतील कारसेवकांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. त्यामध्ये नीला दाते, प्रवीण सावंत, गोरखनाथ परशुराम रिसबूड, अॅड. बाबा परुळेकर, श्रीराम गोडबोले, संतोष पावरी, संपदा जोशी, मोरेश्वर जोशी आणि यशवंत (भाई) आत्माराम धुपकर यांचा समावेश होता. महोत्सवाच्या निमित्ताने कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे तयार करण्यात आलेल्या राघवयादवीयम् या ईबुकचे प्रकाशन करण्यात आले. त्यानिमित्ताने प्रकाशक प्रमोद कोनकर यांचा सत्कार करण्यात आला.अखेरच्या टप्प्यात राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा केलेल्या लहान मुलांनी मंडपात प्रवेश करताच प्रेक्षकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. या प्रसंगाने संपूर्ण सभामंडप भारावून गेला.यावेळी अनुपमेय हो सुरू युद्ध हे, लंकेवरी काळ कठीण आज पातला आणि त्रिवार जयजयकार रामा ही गीतरामायणातील गीते अभिजित पंचभाई यांनी सादर केली. त्यांना प्रसाद करंबेळकर (तबला), दीप्ती कुलकर्णी (हार्मोनियम), मनोज भांडवलकर (पखवाज), प्रज्ञा देसाई (व्हायोलिन) हरेश केळकर, वज्रांग आफळे (तालवाद्य), सावनी नाटेकर (गायन) यांनी साथ केली.