
राममंदिरावरील आक्रमणाचा इतिहास हजार वर्षांचा – आफळेबुवा
रत्नागिरी : अयोध्येत ज्या राममंदिराचे पुनर्निमाण गेल्या २२ जानेवारीला झाले, त्या मंदिरावरील आक्रमणाचा इतिहास थोडाथोडका नव्हे, एक हजार वर्षे जुना आहे, अशी माहिती राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी दिली.यावर्षीच्या कीर्तनसंध्या महोत्सवाकरिता राममंदिर ते राष्ट्रमंदिर हा विषय घेण्याच्या कारणाविषयी आफळेबुवांनी माहिती दिली. येथे सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या पाचव्या दिवशी ते बोलत होते. ते म्हणाले, भारतातील हिंदूंची मंदिरे पाडावीत आणि हिंदूंच्या भावनांना धक्का पोहोचवावा, यासाठी अगदी सिकंदराच्या ग्रीककाळामध्येसुद्धा आक्रमणे झालेली आहेत. इसवी सनाच्या १०२५ मध्ये गझनीने सोमनाथ मंदिर मंदिर फोडले. तेथपासून हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करायला प्रारंभ झाला. त्यानंतर अनेक मंदिरे पाडून तेथे आपले प्रार्थनास्थळ उभे करण्याचा धडाकाच परकीयांनी लावला. नंतर सातत्याने हिंदूंनी लढा दिला. परकीयांच्या आक्रमणामुळे नष्ट झालेल्या हिंदूंच्या मंदिरांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रारंभ स्वातंत्र्योत्तर काळात गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी केला. त्यांनी सर्वप्रथम सोमनाथ मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेतला. अयोध्येतील राममंदिरासाठी मात्रा मोठा लढा द्यावा लागला. विश्व हिंदू परिषदेने त्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी करसेवा करण्यात आली. रथयात्रा काढण्यात आली. नंतर १९८२ साली बाबरी मशीद पाडण्यात आली. या लढ्यात इतर नेत्यांबरोबरच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा वाटा होता. न्यायालयीन लढा जिंकल्यानंतर आता मंदिराची पुन्हा उभारणी झाली आहे. त्याचा आनंद आपण साजरा करत आहोत.महोत्सवाकरिता नेहमीच रत्नागिरी पालिकेतर्फे प्रमोद महाजन क्रीडासंकुल मिळवून देणारे माजी नगरसेवक सचिन करमरकर आणि राजेश ऊर्फ राजू तोडणकर यांचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट येत्या २२ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर यावेळी दाखविण्यात आला.गीतरामायणातील गीतांचे गायन आणि त्यावरील विवेचन अशा स्वरूपाच्या या कार्यक्रमात बुवांनी रम्य ही स्वर्गाहुन लंका, तर वज्रांग आफळे यांनी विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे ही गीते सादर साद केली. अभिजित पंचभाई यांनी पेटवी लंका हनुमंत, सेतू बांधा रे सागरी आणि सुग्रीवा रे साहस असले ही गीतरामायणातील गीतांचे गायन केले. त्यांना प्रसाद करंबेळकर (तबला), दीप्ती कुलकर्णी (हार्मोनियम), मनोज भांडवलकर (पखवाज), प्रज्ञा देसाई (व्हायोलिन) हरेश केळकर, वज्रांग आफळे (तालवाद्य), सावनी नाटेकर (गायन) यांनी साथ केली.