लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सिडकोबाबत विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न- पालकमंत्री उदय सामंत
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सिडकोबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु झाला आहे. सागरी महामार्गालगतच्या गावांचा डिपीआर करण्यासाठी सिडकोची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हाधिकारी, ग्रामपंचायती यांचे सर्व अधिकार अबाधित असल्याचा जीआर लवकरच निघणार असल्याचे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पाली येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.लोकसभा निवडणूक जवळ आल्यानेच विरोधक सिडकोचा ‘बाऊ’ करुन गैरसमज निर्माण करीत आहेत. त्यामुळे स्थानिक संस्थांचे सर्व अधिकार अबाधित असल्याबाबतचा व पसरलेला गैरसमज दूर करण्याबाबतचा जीआर दोन दिवसात निघणार आहे. रत्नागिरीसाठी सागरी विद्यापीठ जाहीर झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे शासकीय विधी महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, आंबा बोर्ड, फणस रिसर्च सेंटर लवकरच सुरु केले जाणार आहे. रत्नागिरी एसटी स्टँण्डचे काम स्थानिक ठेकेदार कंपनीकडून सुरु असून ते लवकरच पूर्णत्वाला जाणार आहे. जिल्ह्याच्या समुद्र हद्दीत किनार्यालगत मासेमारी करणार्या व फिरणार्या परप्रांतीय बोटींवर कडक कारवाईचा बडगा उचलला जाणार असून त्यासाठी एका कमिटीची नियुक्ती लवकरच होणार आहे. त्याचप्रमाणे मागील तीन महिन्याचा डिझेलचा सुमारे साडेसात कोटींचा परतावा जमा झाला असल्याची माहितीही ना. सामंत यांनी दिली. यावेळी उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत, शिवसेना नेते सुदेश मयेकर उपस्थित होते.www.konkantoday.com