
बारसू परिसरातील कातळशिल्पांचे जतन करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
कोकणातील राजापूरच्या बारसू परिसरात हजारो वर्षापासून अस्तित्वात असलेल्या कातळशिल्पांचे जतन केले पाहिजे. यासाठी योग्य ती पावले उचला असे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र आणि राज्य सरकारला दिले. दोन्ही सरकारसह सर्व प्रतिवादींना नोटीसा बजावून प्रतिज्ञाद्वारे भूमिका स्पष्ट करा असे आदेश देत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी २४ एप्रिलपर्यंत तहकूब ठेवली. रत्नागिरीतील बारसू (राजापूर) परिसरातील शेतकरी गणपत राऊत, रामचंद्र शेळके आणि महेंद्रकुमार गुरव यांच्यावतीने ऍड. हमजा लाकडावाला यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ वकील गायत्री सिंग यांनी कोकणातील कातळशिल्पांचे ऐतिहासिक महत्व निदर्शनास आणून दिले. www.konkantoday.com