नारळ झाडावर चढण्याचे प्रशिक्षणाकडे कोकणातील तरूण तरूणींची पाठ
महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या भाट्ये (रत्नागिरी) प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राद्वारे नारळ झाडावर चढण्याचे प्रशिक्षण तरूणांना देण्यात येते, मात्र गेल्या दोन वर्षात कोकणातील तरुण-तरूणींनी प्रशिक्षणाकडे पाठ फिरवल्याची खंत नारळ मित्र प्राशिक्षक प्रियांका नागवेकर यांनी दिली. गेल्या सुमारे १० वर्षात सर्वाधिक प्रशिक्षणार्थी सिंधुदुर्गातील असून रत्नागिरी जिल्ह्यातून प्रशिक्षणाला अल्प प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.केंद्र शासनाच्या पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि सूचना एवं प्रसारण तंत्रालयातर्फे आयोजित वार्तालाप परिषदेत नारळ संशोधन, संवर्धन, नारळ संशोधन केंद्रातून देण्यात येणारे प्रशिक्षण आदी विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी रत्नागिरी भाटये नारळ संशोधन केंद्राचे कृषी विदयावेता डॉ. किरण मालशे, व नारळ मित्र प्रशिक्षक प्रियांका नागवेकर, शांभवी नागवेकर यांनी माहिती दिली. नागवेकर या स्वतः प्रशिक्षणार्थी नारळाच्या झाडावर चढण्याचे प्रशिक्षण देतात. प्रशिक्षण केंद्रात २० प्रशिक्षणार्थी वर्षाला असावे लागतात. यामध्ये ६ महिला व एस.टी., एन.टी. वर्गातील ४ ते ५ प्रशिक्षणार्थी असावे लागतात.शासनाकडून दरवर्षी अनुदान संशोधन केंद्राला मिळते. प्रशिक्षण कालावधीत सहभागी प्रशिक्षणार्थीना दैनंदिन चहा, नाष्टा दिला जातो. व्यायाम, योगासन यांचे धडे दिले जातात. याशिवाय माडावर चढणे, प्रशिक्षण योगासन, नारळ रोपांच्या विविध जातींची माहिती बदलत्या हवामानाला नारळ पिकावर होणारा परिणाम, देखभाल, उपाययोजना आदींवर माहिती दिली जाते. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थीना शेवटी नारळ माडावर चढण्याची शिडी भेट दिली जाते. www.konkantoday.com