
संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथे मृत अवस्थेत बिबट्या सापडला
संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथे मृत अवस्थेत बिबट्या सापडला आहे. या बिबट्याच्या मानेवर जखमा असल्यामुळे दोन बिबट्यांच्या झटापटीमध्ये त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे; परंतु अद्याप पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याचे शवविच्छेदन न झाल्यामुळे नेमके कारण समजू शकलेले नाही.
पांगरी येथील गुरुनाथ दुडये यांच्या घरापासून काही अंतरावर आज सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळला. याची माहिती त्यांनी पोलिसपाटील आणि सरपंचांना दिली. सरपंच सुनील म्हादे यांनी वनविभागाला खबर दिली. वनविभागाचे रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांना दिली. सहकाऱ्यांसह सकाळी नऊ वाजता मृत बिबट्याची पाहणी केली. हा बिबट्या नर असून, दोन वर्षांचा आहे. त्याच्या मानेवर जखमा असून दोन, चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. पांगरी येथील मृत बिबट्याच्या अंगावर जखमा आहेत.