रत्नागिरीहुन संभाजी नगरला निघालेल्या टॅंकर मधील गॅस चोरीला

_गॅस पंपाला पुरवठा करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या टॅंकरमधून जीपीएस प्रणाली बंद करीत चार लाख रुपयांच्या गॅसची चोरी केल्याची घटना वाळूज येथे उघडकीस आली. चालक टॅंकर बेवारस सोडून पसार झाला.याप्रकरणी फरारी टॅंकरचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पोलिसांनी सांगितले की, नागपूर येथील कॉन्फीडन्स पेट्रोलियम इंडिया लि.(गो-गॅस) या कंपनीकडून दुसऱ्या देशातील एलपीजी गॅस आयात करून राज्याच्या विविध जिल्ह्यांत असणाऱ्या गो-गॅस पंपावर विक्रीसाठी पुरविण्यात येतो. २५ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीतील जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट कंपनीतून चालक गोविंद सुग्रीव गुढे (रा. मालेकरी गल्ली, धर्मापुरी, जि. बीड) हा टॅंकरमध्ये (यूपी-५३, ईटी-४१२५) सुमारे २० टन ७० किलो एलपीजी गॅस भरून छत्रपती संभाजीनगरात पंपावर पुरवठ्यासाठी निघाला होता. त्यानंतरच्या चार दिवसांनी म्हणजेच २९ फेब्रुवारीला चालक गुढे याने कांचनवाडी येथील गॅस पंपावर चार टन ६७० किलो, चिकलठाणा पंपावर सात टन ३० किलो, तर जालना येथील पंपावर तीन टन २६० किलो गॅसचा पुरवठा केला.यानंतर जालना येथून तो दोन मार्चला मध्यरात्रीला टॅंकरमध्ये शिल्लक असलेला पाच टन ११० किलो गॅस घेऊन वाळूजच्या गॅस पंपावर पोच करण्यासाठी निघाला होता. मात्र, जालना येथून वाळूजला येत असताना झाल्टा फाट्याजवळ टॅंकरचालक गोविंद गुढे याने टॅंकरची जीपीएस सिस्टीम व स्वत:चा मोबाइल बंद केला. त्यामुळे कंपनीचे सागर पटेल यांना संशय आला.अनेकदा फोन करूनही गुढेचा मोबाइल बंद येत असल्याने काहीतरी गडबड असल्याचे पटेल यांच्या लक्षात आले. टॅंकरसह चालक गायब झाल्याने तसेच टॅंकरची जीपीएस सिस्टीमही बंद झाल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली. ही शोधमोहीम सुरू असताना लिंबेजळगावच्या पथकर नाक्याजवळ हा टॅंकर बेवारस अवस्थेत आढळला.टॅंकरमधील शिल्लक राहिलेला पाच टन ११० किलो गॅस गायब असल्याचे दिसून आले. शिवाय टॅंकरची स्टेपनी, एक टायर, जॅक, पाना, गॅस व साहित्यही गायब असल्याचे आढळले. एकूण चार लाख ३३ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल गायब झाल्याचे कंपनीचे सहायक व्यवस्थापक सागर पटेल यांच्या तपासणीत निष्पन्न झाले. टॅंकरचालक गोविंद गुढे याने टॅंकरमधील पाच टन गॅस कुठेतरी विक्री करून व टॅंकरमधील साहित्य चोरी करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी व्यवस्थापक पटेल यांनी वाळूज पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुढेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button