
फुरुसमधून रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या हायड्राचे दीड लाखाचे टायर चोरीला.
खेड-दापोली राज्य महामार्गाच्या कामासाठी तालुक्यातील फुरुस येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या हायड्राचे १ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे पुढील दोन टायर अज्ञात चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी मालक संजय गणपत शेठ (रा. माणगाव-रायगड) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांनुसार गुरुवारी सायंकाळी उशिरा अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड-दापोली राज्य महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी वापरण्यात येणारा हायड्रा फुरुस येथे रस्त्याच्या बाजूला उभा करण्यात आला होता. १५ एप्रिल रात्री ८ ते १६ एप्रिल सकाळी १० या वेळेत अज्ञात चोरट्याने हायड्राचे पुढील दोन्ही टायर लांबवले. संजय शेठ साईडवर काम करण्यासाठी आले असता टायर चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. आजूबाजूला शोध घेण्यात आला असता टायर सापडले नाहीत.