शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन, कार्यकर्त्यांना पत्र लिहून दिले 10 मार्चचे निमंत्रण
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह शिंदे शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर टीका केली होती त्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी गुहागर येथे सभा घेऊन भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली होती ही टीका भास्कर जाधव यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिलं आहे.
भास्कर जाधव यांचे पत्र….
सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र !!आज माझ्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीचे सिंहावलोकन करताना मला 1985 पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसेच 2007 पासून मला साथ देणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त करावेसे वाटतात. अनेक नेते हे सर्वांना संबोधितांना कार्यकर्ते असं बोलताना मी पाहिले आहे, परंतु मी कायम आपणा सर्वांना सहकारी म्हणूनच संबोधले. होय, तुम्ही सर्व माझे सहकारीच आहात.तुम्ही सर्वांनी मला साथ दिलीत आणि त्याच ऊर्जेतून मी विकासाच्या रूपाने तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये अथवा सार्वजनिक स्वरूपात खंबीरपणे तुमच्या पाठी उभा राहिलोय. अनेक दिग्गज मातब्बरांविरोधात प्रसंगी संघर्षही केलाय. स्वतःचे कुटुंब माता शारदादेवीच्या हवाली सोडून राना-वनात भटकून तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी व शिवसेना वाढविण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. या सर्व कालखंडात माझ्या वक्तृत्व आणि कर्तृत्वामुळे मी यशाची अनेक शिखर पार करू शकलो. मित्रांनो, गेली 42 वर्ष सातत्याने राजकारणात एकेक पायरी वर चढण्याचा मान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भास्कर जाधवलाच मिळालाय..आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना यत्किंचितही न घाबरता उद्धवसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे.हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर तर कधी माझ्या कार्यालयावर वरचेवर हल्ले होतच आहेत. आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जात आहे. अशातच 40 वर्षांपासूनचे माझे जुने-जाणते वयोवृध्द तसेच नवीन व ताज्या दमाचे सहकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे पाहिल्यावर माझा उर भरून येतो व आजही आपण अन्यायाच्या, गुंडगिरीच्या आणि विश्वासघाताच्या विरोधात लढलं पाहिजे, ही उर्जा मिळते.मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे. पण, या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय ? या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत. यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा आहे. सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, तर मग रविवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल, चिपळूण येथे एकत्र येऊया. आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास एकत्र खाऊया..मी आपली वाट पाहतोय..!! भास्कर जाधव.www.konkantoday.com