देवरूख आगाराच्या चालकाने दारूच्या नशेत चालवली बस
देवरूख आगाराची संगमेश्वर-फुणगुस व्हाया करजुवे ही बस चालकाने दारूच्या नशेत चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे चालक दारूच्या नशेत बस चालवत असल्याचे लक्षात येताच वाहकाने तत्काळ बसचा ताबा घेत बस चालवल्याने पुढील अनर्थ टळला आहे. दरम्यान, दारूच्या नशेत बस चालवून प्रवाशांच्या जीवीताशी खेळ करणाऱ्या संबंधित चालकावर एसटी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी एसटी प्रेमींमधून करण्यात आली आहे. संगमेश्वर बसस्थानकातून काल गुरूवारी ११.४० वा. सुटणारी संंगमेश्वर- करजुवे ही बस देवरुख आगाराचा चालक डी. बी. गवळी घेऊन निघाला असता तो बस वेडीवाकडी तसेच मध्येच अतिवेगात हाकत होता. ही बाब वाहक संजय बी. अवटे व प्रवाशांच्या लक्षात आली. तोपर्यंत बस संगमेश्वरपासून सुमारे १४ कि. मी. अंतरावर असलेल्या फुणगूसपर्यंत पोहचली होती. मात्र तिथपर्यंत प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. या बसचे वाहक असलेल्या संजय. बी. अवटे यांच्याही चालक मद्यपान करून आहे हे लक्षात आल्याने त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती देवरुख आगाराच्या वरिष्ठांना दिली. नंतर वरिष्ठांच्या आदेशाचे पालन म्हणून वाहक कम चालक असलेल्या संजय अवटे या वाहकाने फुणगूस येथे चालकाला जबरदस्तीने बाजूला करत प्रवासी तिकीटाच्या कामासह बसच्या स्टेरिंगचा अतिरिक्त ताबा घेऊन करजुवे गाठले तेथून पुन्हा डिंगणीमार्गे फुणगूस-संगमेश्वर अशी सुमारे ३० ते ३५ कि. मी. बस चालवली. व पुढील अनर्थ टळला. दरम्यान, मद्यपान करून बस चालवून प्रवाशांच्या जीवीताशी खेळ करणाऱ्या या संबंधित चालकविरुद्ध देवरुख आगार वरिष्ठांकडे तक्रार देण्यात आली आहे. त्याच्यावर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. एसटीचा प्रवास सुखकर प्रवास समजून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल आता एसटी प्रेमींमधून उपस्थित केला जात आहे. एसटीवर भरोसा ठेवून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवीताशी खेळणाऱ्या अशा चालकाविरूध्द एसटी प्रशासनाने कठोरात कठोर करावी, अशी मागणीही एसटी प्रेमींनी केली आहे. www.konkantoday.com