कीर्तनसंध्या महोत्सवाला रत्नागिरीत थाटात प्रारंभ
रत्नागिरी : वार्षिक कीर्तनसंध्या महोत्सवाला प्रमोद महाजन क्रीडासंकुलात उभारलेल्या भव्य मंडपात आज थाटात प्रारंभ झाला.’आले रामराज्य – अर्थात राम मंदिर ते राष्ट्र मंदिर’ हा यावर्षीच्या कीर्तनसंध्या महोत्सवाचा विषय आहे. अयोध्येत येथील नवनिर्मित राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर रामराज्य या विषयावरील निरूपण राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे करणार आहेत. विषयाच्या अनुषंगाने रंगमंचावर सुमारे १२ फूट उंच, २४ फूट लांबीचा राममंदिराचा देखणा देखावा उभारण्यात आला आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध रांगोळीकार, चित्रकार राहूल कळंबटे यांनी ते चित्र साकारले आहे. या देखाव्यात ८ फूट उंच प्रभु श्रीरामांचा पूर्णाकृती कटआऊटदेखील आहे. हे भव्य चित्र पाहून चांगलीच वातावरणनिर्मिती झाली आणि कीर्तनप्रेमी प्रेक्षक भारावून गेले.रामरक्षा पठण आणि वेदमंत्रांनी महोत्सवाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात फिनोलेक्सचे संचालक सौम्या चक्रवर्ती, पितांबरी उद्योग समूहाचे प्रदीप प्रभुदेसाई आणि श्रीहरी शौचे, पाध्ये गांधी असोसिएटचे आदिनाथ शशिशेखर पाध्ये, देसाई बंधू आंबेवाले आनंद देसाई आणि आफळेबुवा यांच्या हस्ते झाले. मान्यवरांचे स्वागत कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी यांनी केले.सुश्राव्य आवाजातील रामकथा, साथीला गीतरामायण या अजरामर संगीत कलाकृतीतील काही निवडक गाणी आणि पाचव्या दिवशी लळिताचे कीर्तन अशा कथा-गीतरामायण-कीर्तन त्रिवेणी संगमातून आफळे बुवांनी प्रभु श्रीरामचंद्राचे जीवनचरित्र उलगडायला सुरुवात केली. गीतरामायणाचे गायन अभिजित पंचभाई करणार असून प्रसाद करंबेळकर (तबला), दीप्ती कुलकर्णी (हार्मोनियम), मनोज भांडवलकर (पखवाज), प्रज्ञा देसाई (व्हायोलिन) हरेश केळकर, वज्रांग आफळे (तालवाद्य), सावली नाटेकर (गायन) साथसंगत करत आहेत. गीत रामायणातील कुश लव रामायण गाती हे गीत सर्वप्रथम सादर करण्यात आले.