
अज्ञात वाहनाच्या धडकेने जयभीम स्तंभ तुटल्याची घटना
_अज्ञात वाहनाच्या धडकेने जयभीम स्तंभ तुटल्याची घटना शुक्रवारी पहाटे शिरळ येथे घडली. याची पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे भिमसैनिकांमध्ये नाराजी पसरली असून माहिती मिळताच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी येथे भेट दिली. संशयिताला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली असून ही कारवाई झाल्यानंतर येथे नवा स्तंभ बांधला जाणार आहे.याबाबतची फिर्याद हितसंरक्षण समिती शिरळ शाखेचे सल्लागार प्रवीण जाधव यांनी दिली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिरळ फाटा येथे खाजगी जागेत जमीन मालकाची परवानगी घेवून काही वर्षापूर्वी जयभीम स्तंभ बांधला आहे. येथे शिरळ शाखेच्यावतीने अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. त्यामुळे त्याची देखभाल कायम केली जाते. असे असताना हा स्तंभ तुटल्याचे शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत सदस्य गुलजार कुरवले यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याची माहिती प्रवीण जाधव यांना दिली. त्यानुसार ते कार्यकर्त्यांसह तेथे गेले असता त्यांना स्तंभ तुटल्याचे व बाजूला वाहनाच्या टायरच्या खुणा दिसल्या.काही वेळातच याची माहिती वार्यासारखी पंचक्रोशीत पसरली. त्यामुळे भीमसैनिकांनी येेथे गर्दी केली. त्यांना जाधव यांनी शांत राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. www.konkantoday.com