राजापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार आणि आरोग्यविषयक सोयीसुविधा देणारी महत्त्वाची वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे मोठ्यासंख्येने रिक्त
राजापूर, तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार आणि आरोग्यविषयक सोयीसुविधा देणारी महत्त्वाची वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे मोठ्यासंख्येने रिक्त आहेत. तंत्रज्ञांच्याअभावी यंत्रसामग्री धूळ खात पडली आहे. एकंदरीत सुमारे दीड लाख लोकसंख्येचे आरोग्य सांभाळण्यासाठी महत्त्वाचे असलेले हे रुग्णालय आवश्यक असलेल्या सोयीसुविधांअभावी व्हेन्टिलटवर आहे.रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी व अन्य विविध संवर्गातील एकूण २८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ १६ पदे भरलेली असून, १२ पदे रिक्त आहेत. सद्यःस्थितीमध्ये या ठिकाणी केवळ एक वैद्यकीय अधीक्षक आणि दोन वैद्यकीय अधिकारी रुग्णालयाचे काम पाहत आहेत. हे दोन्ही वैद्यकीय अधिकारी तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे अकरा महिन्यांच्या करारावर भरलेले आहेत. याचबरोबर कनिष्ठ लिपिक, औषधनिर्माण अधिकारी, क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, कक्षसेवक अशी चार पदे, सफाई कामगार, दंत शल्य चिकित्सक ही पदे गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त आहेत. या रुग्णालयामध्ये दिवसभरात १०० हून अधिक बाह्यरुग्ण तपासले जातात तसेच उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.www.konkantoday.com