
भारतीय खाद्ययात्रेचे नेतृत्व बिर्याणीकडे कायम; 2024 मध्ये स्विगीवरून 8 कोटी 30 लाख बिर्याणीच्या ऑर्डर
मुंबई – भारतीय खाद्ययात्रेचे नेतृत्व बिर्याणी करत आहे. गेल्या नऊ वर्षापासून स्विगीवरून एखाद्या वर्षात सर्वात जास्त ऑर्डर होणारा पदार्थ बिर्याणी ठरला आहे. सरलेल्या वर्षात एका मिनिटाला बिर्याणीच्या 158 ऑर्डर स्विगीवर आल्या आहेत.
भारतीयांच्या पसंतीला उतरलेला दुसरा पदार्थ म्हणजे डोसा आहे. या वर्षात 2 कोटी 30 लाख इतक्या डोशाच्या ऑर्डर आल्या आहेत. 2024 मध्ये बंगळुरू येथील एकाच व्यक्तीने वर्षभरात 49,900 रुपयाचा पास्ता मागविला. यामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पास्त्याचा समावेश होता.दुपारच्या जेवणापेक्षा रात्रीचे जेवण जास्त प्रमाणात मागविले गेले. रात्रीच्या जेवणाच्या 21 कोटी 50 लाख ऑर्डर आल्या. तर दुपारच्या जेवणाच्या त्यापेक्षा 29 टक्के कमी ऑर्डर आल्या. बंगळूर शहरात 25 लाख मसाला डोसा मागवले गेले.दिल्ली, चंदीगड आणि कोलकत्ता येथे जास्त प्रमाणात छोले, आलू पराठा आणि कचोरीची मागणी होती. या वर्षात चिकन रोलच्या 24 लाख ऑर्डर आल्या.
चिकन मोमोच्या 16 लाख ऑर्डर आल्या तर फ्रेंच फ्राईजच्या 13 लाख ऑर्डर आल्याचे सांगण्यात आले.रात्रीच्या वेळी चिकन बर्गर जास्त प्रमाणात मागविला गेला. रात्रीचे बारा ते सकाळच्या दोन वाजेपर्यंत या वर्षात 18 लाख चिकन बर्गरच्या ऑर्डर आल्या. मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान चिकन बिर्याणीही बर्याच प्रमाणात मागविली गेली. छोट्या शहराबरोबरच मोठ्या शहरातही चिकन बिर्याणीला जास्त पसंती मिळाली असल्याचे दिसून आले.
या आकडेवारीच्या आधरावर पदार्थ निर्माण करणारे आणि स्विगी आपली पुढील कामकाजाची दिशा ठरवीत असते. ऑनलाइन खाद्य पुरवठा मंचाची लोकप्रियता गेल्या काही वर्षात वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारतातील दोन ऑनलाईन खाद्य पुरवठा करणार्या कंपन्यांची शेअर बाजारावर काही महिन्यापूर्वी यशस्वी नोंदणी झाली आहे.