
बऱ्या झालेल्या मनोरूग्णांना होम अगेन मधून मिळतोय मायेचा आधार
उपचार घेतल्यानंतर बरे होवूनही काही मनोरूग्ण आपल्या हक्काच्या घरापासून दूर आहेत. यातील काहींना कुटुंबच नाही तर काहींचा पत्ता सापडत नाही. नातेवाईक येतील या आशेने वाटेकडे डोळे लावून बसलेल्या मनोरूग्णांसाठी द बॅनियन या संस्थेने आधार दिला आहे. ३३ निराधार महिला रूग्णांना या संस्थेच्या होम अगेन या संकल्पनेतून मायेचा आधार मिळाला आहे. या संस्थेच्या माध्यमातून या रूग्णांना रोजगार उपलब्ध होत आहे.द बॅनियन ही चेन्नईची संस्था आहे. मागील २६ वर्षे ही संस्था मनोरूग्णांना आधार देत आहे. या संस्थेमार्फत रत्नागिरीतील होम अगेनची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून निराधार मनोरूग्णांना मायेचा आधार देण्यात येत आहे. प्रादेशिक मनोरूग्णालयातील ज्या महिला रूग्णांचे नातेवाईक नाहीत किंवा ज्यांचा पत्ता सापडत नाही, अशा ३३ महिला मनोरूग्णांना दत्तक घेतले असून भाडेतत्वावर पाच घरे घेतली आहेत. या रूग्णांना नियमित औषधोपचार करण्यात येत आहेत. मोकळ्या वातावरणात आल्यामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. मनोरूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांची वेळोवेळी तपासणी करीत आहेत. या रूग्णांच्या देखभालीसाठी संस्थेमार्फत ८ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.www.konkantoday.com