मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला धनंजय किरांच्या रूपाने एका महान व्यक्तीचे नाव राज्यसरकारचे आभार : जयू भाटकर

रत्नागिरी, दि. २८, प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. त्याबददल राज्यशासनाचे दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांनी आभार मानले आहेत. उपकेंद्राला चरित्रकार धनंजय कीर यांचे नाव दिल्यामुळे नव्या पिढीला त्यांचे कार्य ज्ञात होणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
गुरुवारी मुंबई विद्यापीठाच्या मॅनेजमेन्ट कौन्सिलमध्ये मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव देण्याचा ठराव झाला. त्याबाबत जयू भाटकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांचे आभार मानले आहेत. ५ डिसेंबर २०२० रोजी जयू भाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला रत्नागिरीचे सुपूत्र लेखक चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर सदर पत्रसूचना राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवण्यात आली आहे असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून डिसेंबर अखेर श्री भाटकर यांना कळवण्यात आले. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनाही पत्र दिले आणि मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव देण्याबाबत मागणी करून सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनाही ११ जानेवारीला पत्र दिले होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाठपुरावा केल्याने काल विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कॉन्सिलने रत्नागिरी उपकेंद्राला पद्मभूषण स्व. धनंजय कीर यांचे नाव देण्याचा ठराव संमत केला. याबददल प्रतिक्रिया व्यक्त करताना जयू भाटकर म्हणाले की, आज २८ मे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. स्व. धनंजय कीरांनी सावरकरांचे चरित्र लिहीले. त्या पार्श्वभूमीवर सावरकर जयंतीच्या पूर्वसंध्येला २७ मे ला विद्यापीठाने रत्नागिरी उपकेंद्राला स्व. धनंजय कीरांचे नाव देण्याचा ठराव केला. निर्णय घेतला हा एक कपिलाषष्टीयोग आहे. पद्मभूषण स्व. धनंजय कीरांचे रत्नागिरीतील सुपूत्र डॉ. सुमित कीर आणि त्यांच्या परिवाराचे मी यानिमित्ताने अभिनंदन करतो, असे सांगून श्री भाटकर पुढे म्हणाले की, माझ्या प्राथमिक शाळेच्या शाळा क्र. ३ नगरपरिषद रत्नागिरी – दिवसात शाळेचे मुख्याध्यापक स्व. आखाडेगुरुजी [जाकादेवी, ता. रत्नागिरी] हे रोज प्रार्थना झाल्यावर महान व्यक्तींची माहिती सांगायचे. त्यांच्या या माहितीतूनच स्व. धनंजय कीर यांचे लेखन, व्यक्तीमत्व प्रथम मला कळाले. त्याचवेळी मुख्याध्यापक आखाडेगुरुजींनी स्व. धनंजय कीरांना शाळेत कार्यक्रमाच्या निमित्ताने निमंत्रित केले होते. त्यांच्या सत्कार केला होता. त्यावेळचे स्व. धनंजय कीरांचे भाषण आणि तो ऐतिहासिक दिवस यांचे आज स्मरण होत आहे. विद्यापीठ उपकेंद्राला स्व. धनंजय कीराचे नाव द्यावे ही सूचना, कल्पना मूर्तस्वरुपात साकार होत आहे. ती मी स्व. मुख्याध्यापक आखाडेगुरुजी यांना विनम्रपणे समर्पित करत आहे असे सांगून पुन्हा एकदा श्री. भाटकर यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button