एकही उद्योग धारावीबाहेर जाऊ देणार नाही, धारावी बिझनेसमेन्स वेल्फेअर असोसिएशनचा निर्धार! मुंबई

धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील लघु उद्योगांना कुठे जागा देणार हे स्पष्ट करण्यात आले नसून उद्योग धारावीबाहेर फेकण्याचा डाव आहे. पण एकही उद्योग धारावीबाहेर जाऊ देणार नाही.धारावीतील सर्व छोट्यामोठ्या उद्योगांना धारावीतच जागा द्यावी, अन्यथा धारावीत पुनर्विकासाची एक वीटही रचू देणार नाही असा इशारा धारावी बिझनेसमेन्स वेल्फेअर असोसिएशनने दिला आहे. धारावीकरांना सरसकट पात्र ठरवून त्यांना धारावीतच ५०० चौ. फुटांची घरे द्यावीत आणि उद्योगांनाही धारावीतच समावून घ्यावे या मागण्यांसाठी रविवारी धारावीत एका जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लघु उद्योजकांनी हा इशारा दिला.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख असली तरी दुसरीकडे धारावीला उद्योगनगरी म्हणूनही ओळखले जाते. धारावीत चर्मोद्योग, कापडाचे उद्योग, कुंभारकाम, कचरा पुनर्वापर यांसह अनेक लघु उद्योगांचा, व्यावसायांचा समावेश आहे. धारावीत मोठा कुंभारवाडा असून मोठ्या जागा व्यावसायिकांसाठी उपलब्ध आहेत. आता धारावी पुनर्विकास हाती घेतला असतानाही या व्यावसायिकांना नेमक्या कुठे जागा देणार हे अद्याप धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून (डीआरपी) स्पष्ट करण्यात आलेले नाही.त्यामुळे व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे. त्याचवेळी धारावीबाहेर उद्योग नेले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे धारावीतील लघु उद्योजक, व्यावसायिक एकवटले असून त्यांनी धारावी बिझनेसमेन्स वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून धारावीतच उद्योगांचे पुनर्वसन व्हावे ही मागणी उचलून धरली आहे. यासह अन्य मागण्यांसाठी रविवारी धारावीतील सनाउल्ला कम्पाऊंड येथे सायंकाळी असोसिएशनकडून एका जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेला खासदार वर्षा गायकवाड, खासदार अनिल देसाई, आमदार ज्योति गायकवाड, ॲड राजू कोरडे, बाबूराव माने यांच्यासह धारावी बचाव आंदोलनाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.*अदानीला धारावी गिळंकृत करु देणार नाही*पात्र-अपात्रतेच्या नावाखाली अधिकाधिक धारावीकरांना धारावीबाहेर हुसकावून लावत धारावीत नवीन बीकेसी साकारण्याचा डाव अदानी समूहाचा आहे असा आरोप यावेळी धारावी बचाव आंदोलनाकडून करण्यात आला. सर्व धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच करावे, धारावीकरांना ५०० चौ. फुटाची घरे द्यावीत आणि उद्योगांसाठीही धारावीतच जागा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अदानीला कोणत्याही परिस्थितीत धारावीत नवीन बीकेसी उभी करु देणार नाही, धारावीची जागा गिळंकृत करु देणार नाही असा इशारा देण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे पदाधिकारी समीर मंगरू यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button