ग्राहक पेठमधून महिलांना सकारात्मक उर्जा**युगंधरा राजेशिर्के; महिला दिनानिमित्त बचत गट प्रदर्शन
रत्नागिरी : महिला बचत गट, महिला उद्योगिनींसाठी गेली वीस वर्षे सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे मनापासून काम करत आहेत. त्यांनी आयोजित केलेले हे प्रदर्शन म्हणजे महिलासाठी पायाभूत अभ्यासक्रमासारखे आहे. येथे भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. मैत्रिणी मिळतात, संवाद कौशल्य शिकता येते, सकारात्मक उर्जा मिळते. प्रत्येक वेळी यश मिळतेच असे नाही. पण अपयश आल्यास आपण ते पचवायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ. युगंधरा राजेशिर्के यांनी केले.महिला दिनानिमित्त दैवज्ञ भवन येथे रत्नागिरी ग्राहक पेठ आयोजित महिला बचत गट, उद्योगिनींच्या वस्तू प्रदर्शनाप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी यशस्वी उद्योगिनी म्हणून सौ. स्वाती सोनार, सौ. कोमल तावडे, सौ. शुभांगी इंदुलकर यांचा सत्कार सौ. राजेशिर्के यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महिला पतसंस्थेच्या संचालिका सौ. सरिता बोरकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. फीत कापून व दीपप्रज्वलनाने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.प्राची शिंदे यांनी प्रास्ताविकामध्ये या प्रदर्शनाची वाटचाल थोडक्यात मांडली. २००४ पासून ही महिला बचत गटांची प्रदर्शने भरवण्यात येत असून आजवर अनेकांनी मदत केल्याचे त्या म्हणाल्या.सत्काराला उत्तर देताना सौ. सोनार यांनी सांगितले की, इमिटेशन ज्वेलरी बनवण्याची कला, बोलण्याचे कसब आणि मुंबईची बाजारपेठेची माहिती मला प्राची शिंदे यांनी दिली. प्रदर्शनाच्या निमित्त मी महाराष्ट्राबाहेरही फिरून आले. ग्राहक पेठमुळे माझी उलाढाल ५ लाख रुपयांवर पोहोचली आहे. कोमल तावडे आणि सौ. इंदुलकर यांनीही ग्राहक पेठमुळे व्यवसाय वाढल्याचे आवर्जून सांगताना नव उद्योगिनींना मार्गदर्शन केले. सौ. अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले.हे प्रदर्शन रविवार दि. १० मार्चपर्यंत सकाळी ११.०० ते रात्रौ ८.३० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात कोकण मेवा, महिलांची विविध उत्पादने, खाद्यपदार्थ, इन्स्टंट फूड प्रॉडक्टस्, पूजेसाठी धूप, अगरबत्ती, वाती वगैरे पूजेचे उत्तम दर्जाचे साहित्य पर्सेस, आयुर्वेदिक प्रॉडक्टस्, सौंदर्य प्रसाधने, साड्या, कुर्तीज, ज्वेलरी, हॅन्डीक्राफ्ट प्रॉडक्टस्, विविध ड्रेस मटेरिअल्स, गारमेंटस्, दर्जेदार मसाले, व्हेज नॉनव्हेज खाद्य पदार्थ, तसेच चटकदार भेळ, पाणीपुरी, चाट, टेस्टी कोन व स्नॅक्स इत्यादींचे स्टॉल लावले आहेत.प्रदर्शनात उद्या दि. ८ मार्च रोजी दुपारी ३.३० वा डेली मेकअप, ब्रायडल मेकअप, पार्टी मेकअपचे प्रात्यक्षिक सृष्टी ब्युटी पार्लर (शिरगाव) यांच्यावतीने दाखवण्यात येईल. दि. ९ मार्च रोजी दुपारी ४.०० वा. मराठी शुद्ध लेखन स्पर्धा (स्टॉलधारकांसाठी) फनी गेम्स, दि. १० मार्च रोजी दुपारी ३.०० वा. सांस्कृतिक कार्यक्रम होईल.www.konkantoday.com