
वालोपे येथे चुलतीचा खून केल्या प्रकरणी अटकेत असलेला हरचिलकरवर विना परवाना बंदूक प्रकरणी गुन्हा
मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथे चुलतीचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला पुतण्या प्रकाश गणपत हरचिलकर याच्यावर विनापरवाना बंदूक प्रकरणी रविवारी चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुतण्या प्रकाश हरचिलकर याने शेतकामासाठी गेलेली चुलती लक्ष्मी हरचिलकर यांना एकटे गाठून त्यांचा जमीन वादाच्या रागातून खून केला होता. शिवाय खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने शेतामध्येच लक्ष्मी यांचा मृतदेह टायरसह पेंढा टाकून जाळला होता. या खून प्रकरणी पोलिसांनी प्रकाश याला लोटे आवाशी दाभोळ फाटा परिसरातून ताब्यात घेत अटक केली असून सध्या प्रकाश पोलीस कोठडीत आहे. असे असताना वालोपे येथील एकविरा हॉटेलच्यामागील प्रकाश याच्या शेतघरात बेकायदा विनापरवाना वापरत असलेली १५ हजार रुपये किंमतीची एक गावठी बनावटीची सिंगल बोअरची बंदूक सापडल्याने याप्रकरणी त्याच्यावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. www.konkantoday.com