कीर्तनसंध्येत आफळेबुवा रामकथेतून उलगडणार* *श्रीरामांचे जीवनचरित्र
रत्नागिरी : येथील वार्षिक कीर्तनसंध्या महोत्सव येत्या ९ मार्चपासून सुरू होत असून आफळेबुवांच्या सुश्राव्य आवाजातील रामकथा, साथीला गीतरामायण या अजरामर संगीत कलाकृतीतील काही निवडक गाणी आणि पाचव्या दिवशी लळीताचे कीर्तन असा कथा-गीतरामायण-कीर्तन त्रिवेणी संगमातून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे प्रभु श्रीरामचंद्राचे जीवनचरित्र उलगडणार आहेत.अयोध्येत नव्याने उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी झाला. त्याचे औचित्य साधून ९ ते १३ मार्च २०२४ या कालावधीत ‘आले रामराज्य – अर्थात राम मंदिर ते राष्ट्र मंदिर’ या विषयावर कीर्तनसंध्या महोत्सव रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलावर होणार आहे. रामकथा सांगत असताना बरोबरीने राममंदिर उभारणीचा संक्षिप्त इतिहासही बुवा उलगडून सांगणार आहेत. सुमारे ५०० हून अधिक वर्षांचा संघर्षाचा गोड परिणाम असणाऱ्या अयोध्येतील भव्य राममंदिराचा देखावा हे यावर्षीच्या कीर्तनसंध्येचे वैशिष्ट्य आहे. त्याकरिता प्रमोद महाजन क्रीडासंकुलात स्टेजच्या मागे सुमारे १२ फूट उंच आणि २४ फूट लांब असा राममंदिराचा देखणा देखावा उभारण्यात येत असून रत्नागिरीतील प्रसिद्ध रांगोळीकार, चित्रकार राहूल कळंबटे यांनी ते चित्र साकारले आहे. या देखाव्यात ८ फूट उंच प्रभु श्रीरामांचा पूर्णाकृती कटआऊटदेखील असेल.चौदा वर्षांपूर्वी २०१२ साली रत्नागिरीत कीर्तनसंध्या उपक्रमाला प्रारंभ झाला. मेहनत, जिद्द, कष्ट, सर्वांच्या मदतीच्या जोरावर या रोपट्याची मुळे जमिनीत खोलवर रुजायला सुरवात झाली आहे. कीर्तन आणि त्याच्या साथीने समाजप्रबोधन हे तत्त्व जोपासून, बरोबरीने भारताचा उज्ज्वल देदीप्यमान पण काहीसा विस्मृतीत गेलेला इतिहास पुन्हा लोकांसमोर आणण्याचे अवघड पण अभ्यासपूर्ण वाचनाने आणि आपल्या खास शैलीतून सहजतेने पोहोचवायचे काम विद्यावाचस्पती राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळे बुवांच्या साथीने तेरा वर्षे केले जात आहे. हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत दरवर्षी कीर्तनसंध्या महोत्सव साजरा होत आहे. देणगीदारांच्या भक्कम पाठिंब्यामुळे हे साध्य झाले आहे.याशिवाय दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या कीर्तनसंध्येतही काही विशेष सत्कारही होणार आहे. अखेरच्या दिवशी कीर्तन महोत्सवाचा शेवट लळीताच्या कीर्तनाने होईल. यावर्षी चारुदत्त आफळेबुवांसोबत गीतरामायणाचे गायन अभिजित पंचभाई करणार असून प्रसाद करंबेळकर (तबला), दीप्ती कुलकर्णी (हार्मोनियम), मनोज भांडवलकर (पखवाज), प्रज्ञा देसाई (व्हायोलिन) हरेश केळकर, वज्रांग आफळे (तालवाद्य) साथसंगत करणार आहेत.कार्यक्रमाकरिता सर्वांना मोफत प्रवेश असून देणगीदारांकरिता सन्मानिका उपलब्ध आहेत. दरवर्षीप्रमाणेच कीर्तनसंध्या महोत्सवाचा आस्वाद घेण्याचे आवाहन कीर्तनसंध्या परिवारातर्फे करण्यात आले आहे.www.konkantoday.com