गणपतीपुळे देवस्थानला बँक ऑफ इंडिया कडून रुग्णवाहिका प्रदान
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या संस्थांन श्री देव गणपतीपुळे देवस्थानकडून दिल्या जाणाऱ्या विनामूल्य रुग्णवाहिका सेवेसाठी बँक ऑफ इंडिया रत्नागिरी यांचे मार्फत मंगळवारी विनामूल्य रुग्णवाहिका प्रदान कार्यक्रम गणपतीपुळे देवस्थानच्या भगवतीनगर येथील भक्त निवास सभागृहात संपन्न झाला. .
गणपतीपुळे देवस्थानला सन २०१४ साली पहिली रुग्णवाहिका विनामूल्य स्वरूपात बँक ऑफ इंडिया रत्नागिरी यांचे कडून देण्यात आली होती. या दहा वर्षाच्या कालावधीत गणपतीपुळे देवस्थानकडून अतिशय उत्तम प्रकारे गणपतीपुळे पंचक्रोशीतील गरजू रुग्णांना देवस्थानची रुग्णवाहिका विनामूल्य सेवेसाठी देण्यात आली. त्यानंतर २०२४ मध्ये दुसऱ्यांदा ही विनामूल्य रूग्णवाहिका बँक ऑफ इंडिया रत्नागिरीने गणपतीपुळे देवस्थानला दिली आहे.
या रुग्णवाहिकेद्वारे गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना तातडीने दवाखान्यात दाखल करणे आणि अन्य कारणांनी त्रस्त झालेल्या रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा देण्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आले त्याचबरोबर तब्बल दहा वर्षात रुग्णवाहिका सेवेसाठी विनाअपघात चालक म्हणून देवस्थानच्या चार चालकांनी कौतुकास्पद काम केले त्या चालकांचा विशेष सन्मान रुग्णवाहिका प्रदान कार्यक्रमात बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला .
यामध्ये प्रफुल्ल पाटील, प्रविण वाळवे, अमेय केदार, परेश दुर्गवळी या चालकांचा समावेश आहे. या चारही चालकांनी दहा वर्षाच्या कालावधीत अतिशय उत्तम प्रकारे चालक म्हणून आपली कामगिरी बजावली.
या कार्यक्रमात गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच विनायक राऊत यांनी देवस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती देताना विनामूल्य रुग्णवाहिका सेवेमध्ये दहा वर्षांमध्ये एकूण २००० रुग्णांनी लाभ घेतल्याचे सांगितले तसेच चांगल्या प्रकारची सेवा देण्याचे काम गणपतीपुळे देवस्थानने केल्यामुळे बँक ऑफ इंडियाने पुन्हा दुसऱ्यांदा ही विनामूल्य रुग्णवाहिका देवस्थानला दिल्याबद्दल त्यांनी बँक ऑफ इंडिया आंचल रत्नागिरी यांचे विशेष आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमात गणपतीपुळे देवस्थान समितीकडून बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थित अन्य मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या शुभेच्छापर मनोगतामध्ये बोलताना बँक ऑफ इंडिया रत्नागिरी आंचलिक प्रबंधक नरेंद्र देवरे यांनी सांगितले की, रूग्णवाहिकेद्वारे अतिशय चांगल्या प्रकारची सेवा देण्याचे काम गणपतीपुळे देवस्थानकडून करण्यात आले आहे. या कामाचे विशेष कौतुक त्यांनी आपल्या मनोगतात केले
त्यानंतर मालगुंड येथील डॉक्टर संतोष केळकर यांनी आपल्या मनोगतामध्ये देवस्थानच्या रुग्णवाहिका सेवेचे विशेष कौतुक करून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा दिल्याची माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी विना अपघात चालक म्हणून काम करणाऱ्या चालकांचे कौतुक केले तसेच या नवीन रुग्णवाहिकेमध्ये अति गंभीर रूग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना आपल्या मनोगतात केली.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून बँक ऑफ इंडिया रत्नागिरीचे प्रबंधक नरेंद्र देवरे ,मुकुंद खांडेकर भुवनेश्वरी मिश्रा , मिलिंद तिळगुळकर आदींसह गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच विनायक राऊत; पंच डॉ. अमित मेंहदळे, डॉ.श्रीराम केळकर, विद्याधर शेंडये,निलेश कोल्हटकर, गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पकये, भगवतीनगरच्या सरपंच प्रगती भोसले, निवेंडीच्या सरपंच रवीना कदम, नेवरेचे सरपंच दीपक फणसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
या संपूर्ण कार्यक्रमाला बँक ऑफ इंडिया गणपतीपुळे चे शाखाधिकारी चैतन्य आठवले, कर्मचारी अतुल कुवारे विवेक चव्हाण ,जितेंद्र चाफेकर आदींसह डॉ. संतोष केळकर ,गणपतीपुळे देवस्थानचे ज्येष्ठ लिपिक महेश भिडे , उदय पडवळे ,मिलिंद पडवळे, भालचंद्र नलावडे, पत्रकार संजय रामाणी,वैभव घाग, वैभव पवार आदींसह भगवतनगर,मालगुंड ,गणपतीपुळे भागातील प्रतिष्ठित ग्रामस्थ व देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणपतीपुळे देवस्थानच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
www.konkantoday.com