
लोटे व वेरळ येथून दुचाकींची चोरी
खेड : तालुक्यातील लोटे व वेरळ येथून दोन दुचाकींची चोरी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास सुरू आहे. लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील एम्को पेस्टिसाईड लिमिटेड कंपनीच्या गेट समोर उभी करून ठेवलेली सुमारे 25 हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची शाईन दुचाकी (एमएच 08 ए आर 6329) अज्ञात चोरट्याने चोरल्याप्रकरणी मनिष वसंत निकम (वय 28, रा. कुळवंडी, तांबरीचीवाडी खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि.9 रोजी सकाळी 7 ते दि. 10 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या मुदतीत घडली. तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्वमधील स्नेहा अपार्टमेंट इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली सुमारे 20 हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (एम.एच.08, एन 2734) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. दि.11 रोजी रात्री 9 ते दि.12 रोजी दुपारी 12 या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणी विठोबा विष्णू घाणेकर (वय 57, रा.वेरळ) यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.