सामान्य नागरिकाला सेवा वितरणाचे जिल्ह्याचे प्रमाण चांगले* *महसूल, पोलीस, कामगार विभाग उल्लेखनीय* *- कोकण विभाग राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग
रत्नागिरी, दि. 5 : राज्यामध्ये 593 ऑनलाईन सेवा अधिसूचित केल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकाला देण्यात येणाऱ्या सेवा वितरणाचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमाण चांगले आहे. महसूल, पोलीस, कामगार या विभागांची कामगिरी उल्लेखनीय आहे, असा गौरव कोकण विभाग राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, सहसचिव माणिक दिवे, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) शुभांगी साठे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते. कोकण विभाग राज्य सेवा हक्क आयुक्त श्री. सिंग यावेळी म्हणाले, राज्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 कायदा 28 एप्रिल 2015 रोजी प्रसिध्द करण्यात आला. त्यानंतर त्याची अंमलबजावणी राज्यात सुरु करण्यात आली. या सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध कालावधी ठरवून दिला जातो. यानुसार पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. महसूल, कामगार, पोलीस विभागाचे कामकाज चांगले आहे. ज्या विभागांची प्रलंबित अर्ज संख्या दिसत आहे. त्यांनी त्याबाबतची कारणे जाणून निवारण करण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या संबंधित असणाऱ्या सेवांचे वितरण वेळच्या वेळी व्हायला हवे, त्यासाठी सुधारण आवश्यक आहे. महाराष्ट्रात लोकसेवा हक्क अधिनियमबाबत व्यापक प्रसिध्दी देण्यात येणार असून, त्याबाबत मीडिया प्लॅन करण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा देताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी महाआयटी व एनआयसीमार्फत सोडविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आपले सरकार सेवा केंद्र जिल्ह्यात ज्याठिकाणी निष्क्रीय आहेत, त्याबाबतची कारणे तपासून ती सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रलंबित प्रकरणे व अपिले यांचा आढावा घेऊन त्यांचा निपटारा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. *सेवा वितरणाचे जिल्ह्याचे 96 टक्के प्रमाण – जिल्हाधिकारी*जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी जिल्ह्याच्याबाबत माहिती दिली. 2015 ते 2024 या कालावधित महसूल विभागाला 15 लाख 88 हजार 261 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 15 लाख 17 हजार 317 सेवांचे वितरण झाले आहे. हे प्रमाण 96 टक्के आहे. गृह विभागाला 90 हजार 124 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 81 हजार 240 अर्जांची निर्गती झाली आहे. हे प्रमाण 90 टक्के आहे. 2023-24 मध्ये महसूल विभागाकडे 2 लाख 39 हजार 955 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 2 लाख 17 हजार 983 अर्जांची निर्गती झाली आहे. गृह विभागाकडे 13 हजार 819 प्राप्त अर्जांपैकी 12 हजार 249 अर्जांची निर्गती झाली आहे. एकूणच सर्व विभागांचे मिळून 2 लाख 63 हजार 928 प्राप्त अर्जांपैकी 2 लाख 38 हजार 360 अर्जांची सन 2023-24 मध्ये निर्गती झाली असून, हे प्रमाण 90 टक्के आहे. आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 15 कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये विशेषत: सर्व विभागांनी संकेतस्थळावर माहिती प्रदर्शित करणे, ग्रामसभेत सेवांचे वाचन करणे, सेवा हमी कायदा फलक प्रदर्शित करणे, आपले सरकार सेवा केंद्र जिल्ह्यात सक्रीय ठेवणे, यामध्ये 18 सेवा केंद्र आदर्श बनविणार आहोत. या कायद्याची जनजागृती करणे, नियमित बैठका घेणे आणि नाविण्यपूर्ण उपक्रम करणे यावर विशेषत: भर आहे.www.konkantoday.com