
मुंबई-गोवा महामार्गाच्या उड्डाणपुलांखाली पार्किंग केल्याने होताहेत अपघात
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलांसह बनविलेल्या बोगद्यांचा वापर वाहनांच्या पार्किंगसह दुरुस्तीसाठी होत असल्याने निर्माण होत असलेल्या अडथळ्यांमुळे अपघाताचे धोके वाढले आहेत. दरम्यान, विनापरवाना होणारे पार्किंग विरोधात कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्याच्या कार्यक्षेत्रात वाटूळपासून पुढे येरडव फाटा, ओणी बाजारपेठ, राजापूर पेट्रोलपंप परिसर, हातिवले आदी भागात आजुबाजूच्या परिसराकडे ये-जा करण्यासाठी सोयीचे पडावे म्हणून तेथे उड्डाण पूल बांधण्यात आले. बर्याचवेळा तर काही मोठी वाहने तर एका रेषेत उभी असतात. त्यामुळे महामार्गावरून किंवा आजुबाजूच्या परिसरातून आलेल्या वाहनांना अडथळे ठरत आहेत. बर्याच वेळा अचानक आलेल्या वाहनांची तेथे उभ्या असलेल्या वाहनांना धडक बसून अपघात होण्याचा धोकादेखील असतो. यापूर्वी एकदोन वेळा असे प्रकार घडले होते. मात्र ते अपघात किरकोळ होते. सुदैवाने फारसे नुकसान झाले नव्हते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलांसह काढलेल्या बोगद्यांचा वापर विनापरवाना वाहळ तळासाठी होत असताना व वाहतुकीच्या दृष्टीने ते धोकादायक ठरत असताना त्या विरोधात कोणतीच कृती वा कारवाई होताना दिसत नाही.




