
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पंचवीस टक्क्याहून कमी पाऊस
रत्नागिरी : जून महिना संपत आला तरी जिल्ह्यामध्ये मान्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळे मशागतीची कामे खोळंबली आहेत. याशिवाय भात लावणीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. गेल्यावर्षी 1 ते 23 जून या कालावधीत जिल्ह्यात सरासरी एक हजार मि. मी. पाऊस झाला होता. तो यावर्षी याच कालावधीत 25 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकर्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. 1 ते 23 जून या कालावधीत सरासरी 219 मि.मी. पाऊस झाला आहे. याच कालावधीत गेल्यावर्षी मात्र 1024 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यामुळे पंचवीस टक्क्याहून पर्जन्यवृष्टी कमी झाली आहे. याचा परिणाम भातपिकावर होणार
आहे. पाऊस लांबल्याने सुरुवातीला केलेली भात पेरणी अडचणीत येते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, शेतकर्यांच्या सुदैवाने पावसाची सुरुवात झाली आणि भात बियाणे रुजले. परंतु, त्यानंतर करण्यात येणारी मशागत पावसाअभावी खोळंबली आहे. अजूनही पडलेल्या पावसामुळे जमिनीमध्ये ओलावा निर्माण झालेला नाही किंवा नद्या-नाले दुथडी भरून एकदाही वाहलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी राजा पावसाकडे डोळे लावून बसला आहे.