पोकलेन डांबरी रस्त्यावर चालवल्याने रस्ता उखडला,**पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार
दापोली तालुक्यातील उन्हवरे-तांबडवाडी रस्त्यावर उर्दू शाळेजवळ पोकलेन मशिन रस्त्यावर उतरून डांबरी रस्त्यावरूनच ती मशिन चालवतच नेल्याने नव्याने झालेल्या डांबरीकरण केलेला रस्ता आता अनेक ठिकाणी उखडला आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून पोकलेन मालकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. रस्त्याची मालकी जरी उन्हवरे ग्रुपग्रामपंचायतीकडे असली तरी हा रस्ता ग्रामस्थांच्या १५ टक्के लोकवर्गणीतून यशवंत ग्रामसमृद्धी या योजनेतून करण्यात आला होता. सुमारे १५ वर्षापूर्वी डांबरीकरण झालेला हा रस्ता नादुरुस्त झाल्यावर ग्रामस्थांनी आमदार योगेश कदम यांच्याकडे मागणी केली. तब्बल ७ वर्षानंतर या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होऊन रस्ता डांबरी झाला; मात्र पोकलेन रस्त्यावरून गेल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. आता हेच खड्डे पावसाळ्यात मोठे होऊन संपूर्ण रस्ता नादुरुस्त होण्याची शक्यता आहे. त्याचा त्रास ग्रामस्थांसह वाहनचालकांना होणार आहे.पोकलेन एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाताना मोठ्या वाहनाचा वापर करावा लागतो. कारण, या मशिनला टायरऐवजी चैन असते. त्यामुळे तो रस्त्यावर चालवता जात नाही; मात्र रणगाड्याप्रमाणे चैन असलेली हा पोकलेन डांबरी रस्त्यावर चालवल्याने रस्ता उखडला आहे. त्यामुळेच या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती उन्हवरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुराद चिकटे व तंटामुक्त कमिटी अध्यक्ष निसार चिकटे यांनी दिली.