अजितदादा उपमुख्यमंत्री नसते तर महाविकास आघाडीचे सरकार ८ दिवसही टिकले नसते – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरें
भाजपासोबतची चर्चा पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यावरूनच झाली. १५-२० दिवसांत घडामोडी घडल्या. दिल्ली आणि मुंबईतल्या बैठकीत मी सहभागी होतो. सकाळच्या शपथविधीबाबत काळाच्या ओघात उत्तरे मिळतील.हल्ली अनेकजण स्वत:ला फार काही समजण्याच्या नावाखाली अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिले चूक झाली असं विधाने करतात. पण अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिले ही मेहरबानी नव्हती. अजितदादा उपमुख्यमंत्री नसते तर महाविकास आघाडीचे सरकार ८ दिवसही टिकले नसते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केला आहे.सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवारांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय आत्ताच घेतला नाही. तर २०१४ पासून पक्ष नेतृत्वाने याची सुरुवात केली होती. २०१४ ला भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पक्षात संघर्ष नव्हता. भाजपासोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय सर्वोच्च स्तरावर झाला. २०१६-१७ मध्येही मी प्रदेशाध्यक्ष असताना भाजपासोबत जाण्याचा निर्णय झाला. जवळपास मंत्रिमंडळातील खाती ठरली होती, पालकमंत्रिपदे ठरली. लोकसभेच्या जागांचे वाटपही झाले होते असं तटकरेंनी सांगितले. तसेच काही कारणास्तव ती चर्चा पुढे गेली नाही. २०१९ ला विधानसभेच्या निवडणुकीचा स्पष्ट कौल भाजपा-शिवसेना युतीला मिळाला. १७६ जागांवर युती निवडून आली होती. आघाडीला १०० जागा मिळाल्या होत्या. जनतेचा कौल कुणी, कशाला आणि का नाकारला हे पाहा. त्यातूनच महाविकास आघाडी निर्माण झाली.www.konkantoday.com