सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या वतीने चिपळूणमध्ये चर्चासत्र संपन्न
_रत्नागिरी : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय चर्चासत्राला उदंड प्रतिसाद मिळाला. हे चर्चासत्र खेर्डी येथील हॉटेल तेज ग्रँड येथे झाले. या चर्चासत्राला रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली येथील ३० चार्टर्ड अकाउंटंट व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला.सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मुकुंद मराठे यांनी प्रास्ताविक करताना संस्थेने वर्षभरात केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच गेल्या वर्षभरात विविध करविषयक आणि व्यावसायिक नीतिमत्ता विषयांवर केलेली विविध चर्चासत्रे, बैठका व निवासी सेमिनार यांच्यासंदर्भात देखील माहिती दिली. चर्चासत्र दोन टप्प्यात पार पडले. सकाळच्या सत्रामध्ये सीए. अनुप शहा यांनी नव्याने पारित झालेला मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा आणि सीए म्हणून काम करताना असेलल्या जबाबदाऱ्या विशद केल्या. त्यानंतर लेखापरीक्षण करताना आवश्यक असणारी प्रमाणे अर्थात ऑडिटिंग स्टँडर्ड्स याविषयी विस्तृत चर्चा केली.दुपारच्या सत्रामध्ये पुणे येथील सीए रोहित शहा यांनी AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावरील प्रभाव स्लाईड शो सह दाखवला. आज आधुनिक तंत्रज्ञानाने काही सेकंदात आपल्याला हवी ती माहिती मिळत असली तरी ती इंटरनेट रोबोटद्वारे मिळत असल्याने तिची सत्यता पडताळणे जरुरी आहे. मानवाला जशा भावना किंवा तर्कशास्त्र आहे तसे या आर्टीफिशियल तंत्रज्ञानाला नाही. त्यामुळे मानवी ज्ञानाला भविष्यात पर्याय असू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.शेवटच्या सत्रात अनुप शहा यांनी इन्कमटॅक्स मधील व्यापाऱ्यांना महत्वाच्या असणाऱ्या खर्च आणि देणी विषयक तरतुदींवर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांसंदर्भांत आपल्या शंका उपस्थित करून त्यावर कायदेशीर सल्लामसलत केली. अशा चर्चा सत्रांमुळे दर वेळी नवनवीन येणाऱ्या कायदे व नियमांबाबत माहिती मिळत असल्याने सीए इन्स्टिटयूट सतत या प्रकारचे सेमिनार व बैठका आयोजित करत असते.सूत्रसंचालन सीए स्वाती ढोल्ये यांनी केले. सीए शशिकांत काळे, सीए गुरुनाथ भिडे आणि सीए श्रेयस काकिर्डे यांनी आपपल्या व्यवसायातील अनुभव विशद केले; आणि सीए व्यवसायात येणारी नवनवीन आव्हाने मांडली. सीए अमित ओक आणि सीए सुमेध करमरकर यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.www.konkantoday.com