
कोकणात गुन्हेगारी वाढू लागली, छेड काढल्यामुळे रेल्वेतून उडी घेतलेल्या जखमी युवतीवर अत्याचार
ट्रेनच्या बोगीत असलेल्या युवकाच्या अश्लील हावभावांना घाबरून ट्रेनबाहेर उडी मारल्याने गंभीर जखमी झालेल्या युवतीवर संशयित युवकाने शारिरीक अत्याचार केल्याचेही वैद्यकीय तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी त्या संशयित ३० वर्षीय युवकाला अटक करून रविवारी सायंकाळी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर तपासकामा सुरू असल्याचे सांगत संशयित तरूणाचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. दरम्यान पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनीही रविवारी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने सिंधुदुर्गात खळबळ उडाली असून प्रवासी महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सदरची घटना साकेडी रेल्वे फाटकापासून काही अंतरावर शनिवारी दुपारी ३.३० वाजण्यााच्या सुमारास घडली होती. पीडित युवती आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी रत्नागिरी येथे जाण्यासाठी कणकवली रेल्वेस्थानकावर आली.
एर्नाकुलम-पुणे (१०१५०) ट्रेन स्थनावरून सुटत असल्याने युवती घाईगडबडीत सर्वात मागे असलेल्या हॅण्डीकॅप बोगीत शिरली. त्याचवेळी स्थानकावर उभा असलेला सदरचा संशयित युवकही त्याच बोगीत शिरला होता. पुढे साकेडी रेल्वेफाटकापासून काही अंतरावर युवतीने ट्रेनबाहेर उडी मारली होती. तर त्या युवकानेही चेन खेचून ट्रेन थांबवली व बाहेर उडी घेतली होती. तर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून तेथे ट्रॅकवर काम करत असलेल्या कर्मचार्यांच्या साथीने जखमी युवतीला कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. तर संशयित युवकास कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
पोलिसांनी जखमी युवतीचा जबाब घेतला. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. युवती हॅण्डीकॅप बोगीमध्ये चढली तेव्हा तिच्या मागोमाग त्याच बोगीमध्ये चढलेल्या त्या संशयित युवकाने काही अश्लिल हावभाव करण्यास सुरूवात केली. युवक तिच्याजवळ येवून अधिक लगट करू लागला. या प्रकाराने प्रचंड घाबरलेल्या युवतीने आरडाओरड केली. याच दरम्यान साकेडी रेल्वे फाटकानजिक ट्रेनचा वेग कमी झाल्याने युवतीने ट्रेनबाहेर उडी मारली. पुढे ट्रेनमधून तेथे उतरलेल्या त्या युवकाने ट्रॅकनजिकच शारिरीक अत्याचार केला, असे युवतीने पोलिसांना सांगितले. तेथील कामगारांनी व रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्यांनी युवतीला रूग्णालयात दाखल केले. त्या कामगार व रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्यांनी या युवकास रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
www.konkantoday.com
त qदिले.
www.konkantoday.com