पतसंस्था चळवळ अधिक सक्षम करू या : अ‍ॅड. दीपक पटवर्धन; फेडरेशनच्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड

रत्नागिरी : कोकणाला प्रथमच राज्यातील पतसंस्था फेडरेशनचे राज्य कार्याध्यक्षपद मिळाले आहे, या पदाला न्याय देऊन पतसंस्था चळवळ अधिक सक्षम व व्यापक होण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही नूतन कार्याध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली. राज्यातील पतसंस्थांच्या कोट्यवधींच्या ठेवी बँकांमध्ये आहेत. काही बँका बुडाल्यामुळे सुमारे एक हजार कोटी रुपये अडकून पडले आहेत. ते परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू आहे, असेही पटवर्धन यांनी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण मिळाले पाहिजे, याकरिता राज्य फेडरेशनचे प्रयत्न चालू आहेत. पतसंस्थांमधील कर्ज थकल्याने ती एनपीएमध्ये जातात व वसुली करताना अनेक अडथळे येतात. त्यामुळे कर्जाबाबतीतील कायदेशीर कागदपत्रांचे प्रमाणीकरण करण्यासाठी मोहीत आखणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचे सभासदत्व सर्व पतसंस्थांनी घेतल्यास त्याद्वारे डिजीटल व्यवहार शक्य होणार आहेत. कोविडनंतरच्या काळात डिजिटल व्यवहारांद्वारे सहकार चळवळ वाढवण्याचे उद्दिष्ट त्यांनी सांगितले. अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व संचालकांच्या सहकार्याने फेडरेशन अधिकाधिक चांगले काम करणार आहे. 30 वर्षे सहकारातील कार्यकर्ता म्हणून काम करतोय. 20 वर्षे राज्य पतसंस्था फेडरेशनवर संचालक आहे. स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा पतसंस्था फेडरेशन, हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन, पदवीधर नागरी पतसंस्था, हौसिंग सोसायटी फेडरेशन अशा संस्थांमध्ये पदाधिकारी आहे.
यापूर्वी फेडरेशन पतसंस्थांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. प्रत्येक समस्येवर मार्ग काढण्यासाठी लढा दिला आहे, असे पटवर्धन म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button