
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे सूत्रधार नितेश राणे असल्याचा राजन तेली यांच्याकडून गंभीर आरोप
दसऱ्याच्या मुहूर्तावर तळकोकणात मोठा राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असणारे राजन तेली यांनी पक्षावर टीका करत शिवबंधन तोडले आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आता जुन्या सहकाऱ्यांसोबत नक्कीच काम करण्याची संधी मिळेल, असे भाष्य त्यांनी केले. त्यांचे हे वक्तव्य कट्टर विरोधक असणारे खासदार नारायण राणे त्यांचे सुपूत्र पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार आमदार निलेश राणे यांच्याशी मनोमिलनाच्या संदर्भात होते. मात्र शिवसेनेत प्रवेश करून चारच दिवस होत नाही तोच त्यांनी पहिलाच वार पालकमंत्री नितेश राणेंवर करत गंभीर आरोप केले. यामुळे तळकोकणात पुन्हा एकदा तेली विरुध्द राणे असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता असून तेलींनी केलेले आरोप आता शिवसेना आमदार निलेश राणेंना मान्य आहेत? असा सवाल तळकोकणातील राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मूळ शिवसेनेत प्रवेश करत माजी आमदार राजन तेली यांनी उद्धव ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारले होते. मात्र त्यांचा पराभव झाला आणि आता आठ महिन्यांनी त्यांनी ठाकरेंची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे तळकोकणातील सिधुंदुर्ग जिल्ह्यातील आता तेली विरूद्ध राणे हा वाद संपेल असे बोलले जात होते.मात्र प्रवेशानंतर अवघ्या चारच दिवसांत तेलींनी तळकोकणात धमाका उडवून देत पहिलाच वार थेट राणेंवर काढला. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपांमुळे आता तळकोकणासह राज्याच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी तेली यांच्यासह आठ जणांची दिल्लीतील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडे तक्रार दाखल आहे. याचीच आता चौकशी लागणार असल्यानेच तेली यांनी आपली यातून सुटका करून घेण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आहे. एकीकडे अशा चर्चा सुरू असतानाच तेली यांनी या प्रकरणात राणेंनाही ओढले आहे.




