रत्नागिरी जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ३९३ ग्राहकांकडे २३ कोटी ८८ लाखांची थकबाकी
महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल भरले जात नसल्याने थकबाकीची रक्कम वाढत चालली आहे. जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ३९३ ग्राहकांकडे २३ कोटी ८८ लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी वेळेत वसूल न झाल्यास महावितरणच्या निकषानुसार ग्राहकांना भारनियमनाचे चटके साेसावे लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी पथदीप ग्राहकांची आहे. पथदीपची १,६९० स्थानिक स्वराज्य संस्थाकडे ६ कोटी ८६ लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकी भरण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडेही पाठपुरावा सुरू आहे. त्यापाठोपाठ ८२,३४५ घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. वाणिज्यिक, कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा, औद्योगिक ग्राहकांकडेही कोट्यवधींची थकबाकी आहे.महावितरणकडून फिडरनिहाय भारनियमन केले जाते. ज्या फिडरवर थकबाकीचे प्रमाण अधिक, विजेची चोरी, वीज गळती या निकषांच्या आधारे भारनियमन करण्यात येते. सध्या जिल्ह्यातही वीजचोरी, आकडा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच वीजबिल न भरण्याची मानसिकता वाढत आहे. त्यामुळे भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातही वर्गवारीनुसार भारनियमनाचे चटके साेसावे लागण्याची शक्यता आहे.www.konkantoday.com