देवरूख- मार्लेश्वर मार्गावरील कासारकोळवण गावाला जोडणाऱ्या बावनदीवर मोठा पूल करण्याची मागणी
संगमेश्वर, तालुक्यातील देवरूख- मार्लेश्वर मार्गावरील कासारकोळवण गावाला जोडणाऱ्या बावनदीवर मोठा पूल व्हावा, अशी मागणी कासारकोळवणचे सरपंच मानसी करंबेळे, उपसरपंच प्रकाश तोरस्कर व पोलिस पाटील महेंद्र करंबेळे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना मुंबईतील भेटीवेळी दिले. या पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या पुढाकारामुळे उपमुख्यमंत्री पवार यांची मुंबईत भेट झाली. कासारकोळवण हे गाव देवरूख येथील सुमारे १० कि. मी. अंतरावर आणि देवरूख-मार्लेश्वर या मुख्य रस्त्यालगत आहे. तिथे अजूनही एसटी पोहचलेली नाही. त्यामुळे अनेक विकासाच्या बाबींपासून ग्रामस्थ वंचित आहेत. बावनदी पुलावर मोठा पूल नसल्यामुळे फार मोठी अडचण होत आहे. हा प्रश्न आजवर अनेक कारणांमुळे प्रलंबित राहिला आहे. आमदार निकम यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर सर्व अडचणी सुटल्या असून, या पुलासाठी निधीची आवश्यकता आहे. प्रस्तावित असलेला हा पूल झाल्यानंतर गावच्या विकासाला अनेक अंगाने चालना मिळेल. जवळच असलेल्या मार्लेश्वर पर्यटनस्थळामुळे गावात आणि परिसरात कृषी, निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल. वाहतुकीची सोय झाल्यामुळे परिसरात रोजगार, व्यवसायही वाढले. कासारकोळवण हे गाव अतिशय दुर्गम भागात असून, दळणवळणासाठी बावनदीवरील पूल अत्यावश्यक आहे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.www.konkantoday.com