
मिरकरवाडा येथे सुमारे 16 लाख 67 हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेले मच्छी मार्केट रिकामे, मत्स्य विभाग आक्रमक
मिरकरवाडा येथे सुमारे 16 लाख 67 हजार रुपये खर्चून मच्छीमार्केटची उभारणी करण्यात आली आहे. पण तेथील चांगल्या सुविधा मच्छि विकेत्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या असताना त्या मार्केटमध्ये बसण्यास विक्रेत्यांनी पाठ फिरवलेली आहे. मासळी विकण्यासाठी अजूनही मिकरवाडा जेटीवरच विक्रेते बसत असल्याने त्या सर्व विक्रेत्यांना तेथून हटविण्यासाठी अखेरची नोटीस मत्स्य विभागाने दिली आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा हे सर्वात मोठे बंदर म्हणून ओळखले जाते. या बंदरात दरदिवशी मोठ्या प्रमाणात मासळीची चढ-उतार होउन आर्थिक उलाढाल होत असते. अशा येथील जेटीच्या धक्क्यावरच मोठा मासळी बाजार दरदिवशी भरतो. त्याठिकाणी ये-जा करणार्या वाहनांच्या मार्गातच मासळी विक्रेते बस्तान मांडतात. त्यामुळे जेटीवर मासळी घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यातून मासळी नेण्यासाठी ये-जा करणाऱया वाहनांना मार्ग काढणे जिकरीचे बनते. तसेच जेटीवर देखील एका ठिकाणी मच्छी विक्री करावी म्हणून सुमारे लाखो रुपये खर्च करून मिरकर वाडा येथे मच्छी मार्केट बांधण्यात आले. परंतु येथील महिला मच्छीमार यांनी त्याला दाद दिली नसून त्या अद्याप ही जेटीवर मच्छी विक्री करत असल्याचे दिसून येते. मिरकरवाडा जेटीमध्ये मोठ्या प्रमाणावर मासे घेऊन जाण्यासाठी वाहनेही आलेली असतात. त्यांना जेटीवर भरल्या जाणार्या मासळी बाजारामुळे मालाची वाहतूक करणे कठीण होऊन जाते. तसेच मच्छीविकेत्या महिला जेटीवर बस्तान मांडत असल्याने तेथे माशांची विक्री करून नको असलेला कचरा तिथेच टाकतात किंवा त्याठिकाणी समुद्राच्या पाण्यात टाकला जातो. त्यामुळे तेथे अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ आणि चांगल्या जागेत मासे विकी व्हावी अशी नागरिकांची मागणी होती. www.konkantoday.com