*रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी सुमारे १० कोटी ६६ लाखाची तरतूद*
रत्नागिरी- राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी वितरित होणे बाकी असलेल्या १५० कोटी रुपयांच्या वितरणाला शासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी सुमारे १० कोटी ६६ लाखाची तरतूद केली आहे. केंद्रीय स्तरावरून उडान योजनेंतर्गत राज्यातील ९ विमानतळांवरून देशांतर्गत विमान वाहतूक सेवेचा विस्तार करण्यासाठी हालचाली सुरू असतानाच हा निर्णय झाल्याने रत्नागिरी येथून ”उडान”ला गती मिळणार आहे.राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी शासनाने अर्थसंकल्पात ३०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी २१० कोटी रुपयांच्या निधी वितरणाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. त्यामध्ये कोल्हापूर विमानतळासाठी २६.८२ कोटी, अमरावती विमानतळासाठी १० कोटी, आरसीएस योजनेसाठी २० कोटी, कराड विमानतळासाठी ३.१८ कोटी असा एकूण ६० कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्षात वितरित करण्यात आला होता. उर्वरित १५० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. त्यामध्ये रत्नागिरी विमानतळासाठी १०.६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचा शासननिर्णय १५ फेब्रुवारीला जारी करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून राज्यातील ९ पैकी कोल्हापूर, जळगाव, नाशिक, नांदेड, गोंदिया आणि सिंधुदुर्ग या सहा विमानतळांवरून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्या आहेत. रत्नागिरी, सोलापूर व अमरावती विमानतळाची कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच येथूनही उडान ५.२ अंतर्गत छोट्या २० आसनी विमानांतून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केंद्रीय स्तरावरून सुरू आहेwww.konkantoday.com