
*नोकरदार महिलेपेक्षा गृहिणीचे योगदान जास्त – सर्वोच्च न्यायालय*
___नवी दिल्ली : घरातील महिलेने केलेल्या कामाचे मोल कार्यालयातून पगार मिळवणाऱ्या महिलेपेक्षा कधीच कमी नसते. घराची काळजी घेणाऱ्या महिलेची भूमिका उच्च दर्जाची असते. हे योगदान पैशात मोजणे कठीण असते, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) म्हटले आहे की, कोणत्याही घरातील गृहिणी आणि कमावत्या महिलांची तुलना केली, तर गृहिणीच्या योगदानाचे मूल्य अधिक मानावे लागेल.न्या. सूर्यकांत आणि न्या. केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने १७ वर्षांपूर्वीच्या एका रस्ता अपघातात महिलेच्या मृत्यूशी संबंधित मोटार अपघात दाव्याची सुनावणी करताना ही टिप्पणी केली. न्यायाधिकरण आणि न्यायालयांनी मोटार अपघात दाव्यांच्या खटल्यांमध्ये गृहिणींचे काम, श्रम आणि त्यागाच्या आधारावर त्यांच्या अंदाजे उत्पन्नाची गणना करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने महिलेचा पती आणि अल्पवयीन मुलाला अडीच लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला. अपिलावर उच्च न्यायालयाला गृहिणी असल्याच्या आधारे दाव्याची गणना करताना ट्रिब्युनलच्या आदेशात कोणतीही चूक आढळली नाही. मात्र यामध्ये महिलेचे अंदाजे उत्पन्न रोजंदारी कामगारापेक्षा कमी मानले गेले होते.हे अपील स्वीकारून सर्वोच्च न्यायालयाने नुकसानभरपाईची रक्कम ६ लाख रुपये केली आणि सहा आठवड्यांच्या आत मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचे निर्देश दिले. कुटुंबात गृहिणीची भूमिका तितकीच महत्त्वाची असते, जितकी भरीव उत्पन्न असलेल्या सदस्याची असते. गृहिणीचे काम एक एक करून मोजले तर निःसंशयपणे तिचे योगदान अमूल्य आहेगृहिणीच्या कष्टांच्या तुलनेत रोजंदारी कामगारापेक्षा कमी वागणूक देण्याच्या उच्च न्यायालयाच्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. असा दृष्टिकोन अवलंबल्याबद्दल न्यायालयाने उच्च न्यायालयाला फटकारले. न्यायालयाने म्हटले आहे की, एका गृहिणीचे उत्पन्न रोजंदारी कामगारापेक्षा कमी कसे मानले जाऊ शकते? आम्हाला हा प्रकार मान्य नाही. गृहिणीच्या कामाचे मूल्य कधीही कमी लेखू नये.www.konkantoday.com