
नगर परिषदेचा बेजबाबदारपणा, गटार खोदाई करताना लघु दाबाची प्रवाहित वीजवाहिनी तशीच ठेवल्याने नागरिकांच्या जीवाला धोका
मुख्य रस्त्यालगत खोदकाम करीत असताना लघु दाबाची वीजवाहिनी राजापूर नगरपरिषदेच्या विभागाने वर काढून ठेवल्याने विजेचा धक्का लागून जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे.
राजापूर न्यायालयासमोर गटाराचे खोदकाम करताना राजापूर नगरपरिषदेने ही लघु दाबाची भूमिगत वीजवाहिनी चराच्या वर काढून ठेवली आहे. या वीजवाहिनीतून वीजप्रवाह सुरू असताना देखील राजापूर नगरपरिषदेने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य केले असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. या ठिकाणी राजापूर न्यायालय, पंचायत समिती व ग्रामीण रूग्णालय असल्याने सातत्याने वाहनांची व माणसांची वर्दळ असते. त्यामुळे नगरपरिषदेने दक्षता घेणे अत्यंत गरजेचे असतानाही नगरपरिषद कर्मचार्यांनी याठिकाणी खोदाई करून बेलाशकपणे ही वीजवाहिनी तशीच वर काढून ठेवल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.