*रत्नागिरी जिल्ह्यामध्ये “जमाव बंदी आदेश” लागू*
___आगामी सन व उत्सव निमित्त तसेच रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी सामाजिक व वैयक्तिक कारणांसाठी व मागण्यांसाठी विविध आंदोलने होऊ नयेत तसेच सोशल मिडियावरुन आक्षेपार्ह पोस्टचे प्रसारण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच जातीय सलोखा व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता रत्नागिरी जिल्ह्यात, मा. अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी दिनांक 10/02/2024 रोजी 00.01 वा. पासून ते दिनांक 24/02/2024 चे 24.00 वा. पर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करून नमूद कालावधीत पुढील प्रमाणे कृत्ये करण्यास मनाई केली आहे. १) शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेऊन फिरणे. २) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे. ३) दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेऊन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. ४) सभ्यता अगर निती या विरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग करणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. ५) इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. ६) सार्वजनिक रीतीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. ७) पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित मनाई आहे.तसेच वरील प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबींकरिता लागू होणार नाहीत. a) अंत्ययात्रा,b) धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकिय कार्यक्रम इत्यादी, c) शासकिय सेवेत तैनात कर्मचारी, d) सार्वजनिक करमणुकीची सिनेमा गृह, रंगमंच इत्यादी.नमूद प्रतिबंधात्मक कालावधीत कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे असल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या मनाई आदेशात नमूद करण्यात आले आहे.*आवाहन:* दि. 10/02/2024 ते दि. 24/02/2024 या मनाई आदेशाच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या निर्गमित आदेशातील तरतुदींचे पालन करावे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता जिल्हा पोलीस दलास सहकार्य करावे.**श्रीमती. जयश्री गायकवाड,* *अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी* *तथा पदभार पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.**www.konkantoday.com