*देवरुख येथील’डी-कॅड’मध्ये विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे प्रदर्शन*
_______क्रेडार संचलित देवरूख कॉलेज ऑफ आर्ट ॲण्ड डिझाईन चित्रकला महाविद्यालयात (डी-कॅड) वार्षिक कला प्रदर्शन १८ ते २५ फेबुवारी या कालावधीत भरणार आहे. प्राचीन काळापासून चित्र, शिल्प, नाट्य, संगीत आणि साहित्य या कलांमुळे समाजाच्या सांस्कृतिक जडघडणीत मोलाची भर पडत असते म्हणूनच कला महाविद्यालयाच्या संकल्पन या वार्षिक कलाप्रदर्शनासाठी ललितकला ही थीम साकारली आहे. चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ही थीम कला रसिकांसमोर मांडली आहे. रंगमंचाकरिता नटराज, विविध वाद्यांचे आकार, संगीतामधील चिन्ह असे आकार व रचना चित्रित केल्या आहेत. गेट डिझाईन करताना पद्मपाणि, वज्रपाणि-अजिंठा, त्रिमूर्ती-घारापुरी, नर्तिका-सिंधू संस्कृती आदींसारखे आकार चित्रित केले आहेत. वॉलपेंटिंगसाठी पाच ललितकलाचे चित्रात्मक संकल्पन रंगवले आहे. प्रदर्शनामध्ये चित्रकलेमधील मूलगामी विचार तसेच भारतीय तसेच पाश्चात्य प्रभावामुळे समृद्ध झालेले कलेचे वातावरण कलारसिकांना अनुभवता येणार आहे. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्राकृती त्यांच्या भावोत्कट रचना, तंत्रवैविध्यामुळे अधिक सुंदर वाटत आहेत.या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी क्रेडारचे अध्यक्ष अजय पित्रे, सचिव विजय वीरकर, ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रय पाडेकर (मुंबई), ज्येष्ठ चित्रकार शशिकांत बने उपस्थित राहणार आहेत. कलारसिकांसाठी हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाहता येणार आहे. www.konkantoday.com