असे भ्याड हल्ले करून कोणीच कुणाला थांबवू शकत नाहीत.-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भाजप नेते निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार चिपळूण येथे घडला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे.यानंतर निलेश राणे यांनी गुहागरच्या सभेत भास्कर जाधव यांचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दलही बोलले. निलेश राणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी असे भ्याड हल्ले करून कोणीच कुणाला थांबवू शकत नाहीत. ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे, निश्चितपणे याची निराशा ही त्यातुन पाहायला मिळत आहे, असे फडणवीस म्हणाले. जी घटना घडली आहे त्यात योग्य कारवाई करू, असेही ते पुढे म्हणाले.
निलेश राणे हल्ला प्रकरण
उद्धव ठाकरेंची सिंधुदूर्ग जिल्ह्यात सभा पार पडली होती. या सभेत भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर जहरी टीका केली होती. निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देत आव्हानही दिलं होतं. गुहागरमध्ये येऊन मी जशास तसं उत्तर देईन असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार निलेश राणे यांची सभा आयोजित होती. या सभेला ते जात असतानाच हा राडा झाला आहे. निलेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन वातावरण तापवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
www.konkantoday.com