*रामनाथ सेवा ट्रस्टतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘आत्मनिर्भर ग्रँट’साठी देवरुख येथील मातृमंदिर या सेवा संस्थेची निवड*
______पुणे येथील ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टतर्फे (तारा) दिल्या जाणाऱ्या ‘आत्मनिर्भर ग्रँट’साठी देवरुख येथील मातृमंदिर या सेवा संस्थेची निवड करण्यात आली आहे. सुमारे १५० संस्थामधून केवळ आठ संस्था यासाठी पात्र ठरल्या असून, त्यात ‘मातृमंदिर’चा समावेश आहे.समाजातील सर्व घटकांसोबत काम करणाऱ्या संस्थांच्या क्षमता बांधणीसाठी ‘तारा’च्या वतीने ‘आत्मनिर्भर ग्रँट’ ही प्रक्रिया चालवली जाते. यामध्ये शेकडो संस्थांमधून केवळ आठ संस्थाचीच निवड केली जाते. या निवड झालेल्या संस्था पुढील वर्षभर ‘तारा’सोबत काम करतात. यावर्षी ही प्रक्रिया डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण करण्यात आली. यात सात संस्थाची निवड करण्यात आली; मात्र मागील आठवड्यात ‘तारा’च्या पदाधिकाऱ्यांनी भेट मातृमंदिर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संस्थेचे कामकाम समजून घेतले. त्यानंतर मातृमंदिरची या प्रक्रियेत निवड झाल्याचे कळविले.या निवड झालेल्या संस्थांना येत्या वर्षभरात ‘आत्मा’ आणि ‘टीबीएल’ या संस्थांकडून क्षमता बांधणीसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात येणार असून, उपक्रम पुढे नेण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. याचा भाग म्हणून झालेल्या पहिल्या कार्यशाळेत संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये आणि सीईओ सतीश शिर्के सहभागी झाले होते. ‘मातृमंदिरसारख्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या संस्थेला ‘आत्मनिर्भर ग्रँट’च्या माध्यमातून सुरू असलेले उपक्रम अधिक क्षमतेने पुढे नेता येतील; तसेच सध्याच्या सामाजिक कामाच्या आवश्यकतेप्रमाणे नवीन उपक्रमदेखील सुरू करता येतील” असा विश्वास संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. हेगशेट्ये यांनी व्यक्त केला.www.konkantoday.com