*सावरकर नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग करायचा असेल तर नाटकांसाठी अनामत रक्कम बंधनकारक*
__वि. दा. सावरकर नाट्यगृहाचे १० कोटी रुपये खर्च करून नुतनीकरण करण्यात आल्यामुळे रत्नागिरीतील नाट्यकर्मींना दर्जेदार रंगमंच मिळाला आहे. नाट्यगृहाच्या सुरक्षेसाठी पालिकेने व्यवसायिक नाटकांसाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम (डिपॉझिट) घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रयोग झाल्यानंतर ती रक्कम परत केली जाईल. तसेच हौशी नाटकांना सवलत देण्यात आली असून त्यांना ३ हजार अनामत भरावी लागणार आहे.रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह पूर्णपणे अद्ययावत करण्यात आले आहे. पालिकेच्या मालकीचे हे नाट्यगृह २००६- ०७ मध्ये सुरू झाले. त्यावेळी अनेक त्रुटी राहिल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी या नाट्यगृहाचे नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे नाट्यगृहाची ध्वनीयंत्रणा, वातानुकूलीन यंत्रणा, आसन व्यवस्था, छप्पर आदींचे नूतनीकरण झाले. नूतनीकरणापूर्वी नाट्यगृहातील वातालुकूलीन यंत्रणा डिझेलवर चालत होती. आता ही यंत्रणा वीजेवर करण्यात आली आहे. आसन व्यवस्थाही आकर्षक केली. दुरुस्तीवर १० कोटी खर्च झाले आहेत. प्रत्यक्ष नाट्यगृहाचा वापर सुरू झाला असून यामध्ये पालिकेला नुकसान होऊ नये, यासाठी नाट्यगृह वापरात भाडेवाढ केली आहे. व्यवसायिक नाटकांसाठी वातानुकुलीत नाट्यगृहाला २० हजार रुपये भाडे तर हौशी नाटकांना १० हजार रुपये भाडे निश्चित केले आहे. नाट्यगृहातील कार्यक्रमादरम्यान कोणत्याही प्रकारचे साहित्य अथवा खुर्चा, दरवाजे, विंग, तसेच इतर उपकरणांचे नुकसान होऊ नये, यासाठी व्यवसायिक नाटकांना ५ हजार रुपये अनामत रक्कम घेण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यवसायिक नाटकाचे भाडे २५ हजारावर जाणार आहे.परंतु नाटक संपल्यानंतर अर्ज केल्यानंतर लगेच ही अनामत रक्कम परत केली जाणार आहे,www.konkantoday.com