*’लिडकॉम’ ने लाभार्थ्यांच्या घरी जाऊन योजनांचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न करावेत* *-अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे*
*रत्नागिरी, दि. 15 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजना लाभार्थ्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर कार्यशाळा घ्याव्यात. त्याचबरोबर सकारात्मक दृष्टीकोण ठेवून लाभार्थ्यांच्या घरी जाऊन कागदपत्रांची पूर्तता करावी व जास्तीत जास्त प्रस्ताव मंजूर होतील यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी केले. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त ‘लिडकॉम आपल्या दारी’ अंतर्गत कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आज कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जिल्ह्यातील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) बांधवांना अवगत व्हावी, या उद्देशाने तसेच एम. सी. ई. डी. मार्फत देण्यात येणाऱ्या उद्योजकता विकास प्रशिक्षण संबंधी अर्जदार नोंदणी व प्रशिक्षणाची विस्तृत माहिती देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अपर जिल्हाधिकारी श्री. बर्गे म्हणाले, महामंडळाच्या योजनांच्या प्रचार, प्रसिध्दी करण्यासाठी स्थानिक बोली भाषेत प्रचार साहित्य तयार करावे. समाज माध्यमांचा प्रभावी वापर करावा. शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत कशा पोहचतील त्याबाबत नियोजन करावे. वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योजनांचा लाभ घेण्याबाबत लाभार्थ्यांना प्रवृत्त्त करा. तळागळातील घटकांपर्यंत लाभ पोहचवा, असेही ते म्हणाले. भारतीय चर्मकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर, विशेष कार्यकारी अधिकारी विजय कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. www.konkantoday.com