
मी आणि माझ्या कुटुंबावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल,आमदार राजन साळवी ‘एसीबी’विरोधात न्यायालयात दाद मागणार
कोणीतरी माझ्याविरोधात एका कागदावर अर्ज लिहून दिला आणि त्याची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माझ्याविरोधात चौकशी सुरू केली. माझ्या कुटुंबातील अनेकांची चौकशी करण्यात आली.मला हा त्रास जाणीवपूर्वक देण्यात आला आहे. मी आणि माझ्या कुटुंबावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आपण याविरोधात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असे उद्गार ठाकरे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी काढले.
आमदार राजन साळवी, त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्याविरोधात १८ जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आमदार साळवी यांनी आपली पत्नी आणि मुलग्याच्या अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला. तेथे तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले. ते मंजूर होऊन अनुजा साळवी आणि शुभम साळवी यांना अटकपूर्व जामीन मिळाला.
बुधवारी याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार साळवी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला आव्हान देणार असल्याचे सांगितले. आपण याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत आहोत. उच्च न्यायालयात आणि गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात आपण या कारवाईविरोधात दाद मागणार असल्याचे ते म्हणाले. आपण राजकारणात आहोत. अशा पद्धतीची राजकीय कारवाई आपल्याला नवीन नाही. मात्र आपले कुटुंब, पत्नी आणि मुलाला यामध्ये ओढण्याची गरज नव्हती, असेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com