*’महाराष्ट्राची लोकधारा’ शिवराज्यभिषेक प्रसंगाने महाराजांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमला**नाचण्यातील नवलाई ग्रुपचे पालखी नृत्य रोमांचकारी*

*रत्नागिरी – निर्माता रत्नकांत जगताप यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्याऱ्या कार्यक्रमातील शिवराज्यभिषेक प्रसंगाने उपस्थितीत रसिक भारावून गेले. ‘जय भवानी.. जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराज की जय. !’ या जयजयकारांने आसमंत दूमदुमवून गेला. नाचणे येथील नवलाई ग्रुपने सादर केलेले पालखी नृत्य हे रोमांचकारी ठरले. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम काल झाला. कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निलांबरी कुलकर्णी आदी उपस्थित होते. स्थानिक कलाकार सुनिल बेंडखळे आणि राजेश चव्हाण यांनी सादर केलेला ‘कोकणचा साज.. संगमेश्वरी बाज’ हा संगमेश्वरी बोलीचा कार्यक्रम उपस्थितांचे उत्कृष्ट मनोरंजन करुन गेला. यानंतर ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. गणेश नमनाने दमदार सुरुवात करत ‘बोलावा विठ्ठल.. पहावा विठ्ठल.. करावा विठ्ठल..’ तसेच ‘कानडा राजा पंढरीचा’ अशा गीतातून साकारलेल्या पंढरीच्या वारीने उपस्थित रसिकांनाही वारकरी बनविले. ‘झूंजूमुंजू पहाट झाली.., नभं उतरु आलं..चिंबं थरथरवलं..’ अशा ‘एक से बढकर एक’ गीत गायनाने कृषी प्रधान देशातील हिरवाईचा साज गीतामधून साकारत होता. ठाकर गीत, कोळी गीत आणि लावणी नृत्यातील अदाकारीने काही क्षण प्रेक्षक घायाळ झाले होते.*रोमांचकारी पालखी नृत्य..* नाचणे येथील नवलाई ग्रुपच्या सदस्यांनी प्रेक्षकांमधूनच ढोल, ताशांचा निनाद करत, रंगमंचावर पालखी आणली. अत्यंत जोशपूर्ण वातावरणात हे पालखी नृत्य त्यांनी सादर केले. यामध्ये विशेषत: मुलांनी उभा केलेला मनोरा, डोक्यावर फिरवलेली पालखी, उभ्या केलेल्या मनोऱ्यावर उचललेली पालखी, परातीच्या काठावर उभे राहून डोक्यावर तोललेली पालखी असे अनेक चित्तथरारक साहसी प्रकार बराचवेळ या समूहाकडून सुरु होता. या पालखी नृत्यांने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. लोकधाराच्या मंचावर भव्य दिव्य नेपथ्याच्या सहाय्याने मोठ्या संख्येतील कलाकारांनी ‘आई आंबे.. जगदंबे’ या नृत्याविष्कारातून साकार केलेला गोंधळ टाळ्यांचा कडकडाट मिळवून गेला. पारंपरिक गीतांना नव्या पिढीतील गितांची जोड देत, युवा रसिकांसाठी डीजे मधील काही नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या समारोपाकडे जात असताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग कलाकारांनी जोशपूर्ण गितांनी आणि नाट्याने जिवंत केला. छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांसह प्रेक्षकांसमोरुन रंगमंचावर पदार्पण करतात. सनई-चौघड्यांच्या मंगलमयी सुरात, तुतारी स्वरात सिंहासनाधिश्वर होतात. या प्रसंगाने समस्त उपस्थितीत प्रेक्षक वर्ग भारावून गेला. ‘जय भवानी.. जय शिवाजी..,छत्रपती शिवाजी महाराज की जय. !’ या जयजयकारांत यावेळी आसमंत दूमदुमून गेला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button