
*महासंस्कृती महोत्सवाची रत्नागिरीकरांवर तिसऱ्या दिवशीही मोहिनी**लावणी, कोळी नृत्य, ठाकरी नृत्य, दिंडी-वारकरी नृत्यांवर रसिकांचा ठेका*
*रत्नागिरी, – गेले तीन दिवस रत्नागिरीत सुरु असणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाने रत्नागिरीकरांवर मोहिनी घातल्याचे काल पुन्हा एकदा दिसून आले. शाहीर नंदेश उमप यांच्या महाराष्ट्राची संस्कृती या कार्यक्रमातील गण, गवळण, लोकगीते, भारुड, लावणी, कोळी नृत्य, ठाकरी नृत्य, दिंडी-वारकरी नृत्यांवर समस्त रसिक प्रक्षेकांनी ठेका धरला होता. ढोलकीची थाप आणि रसिकांच्या टाळ्यांची अनोखी जुगलबंदी हे कालच्या कार्यक्रमाचे विशेष होते. ‘जाती-धर्माचं सोवळं आपण जाळलं तरच स्वराज्य उजळेलं’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसंगातून दिलेला हा संदेश आजही तंतोतंत उपयुक्त ठरणारा असा आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात शाहीर नंदेश उमप प्रस्तुत ‘महाराष्ट्राची संस्कृती’ हा कार्यक्रम काल झाला. तत्पूर्वी कोकण नमन कला मंचच्यावतीने भजन ही पारंपरिक लोककला सादर करण्यात आली. शाहीर श्री. उमप यांच्या भारदस्त पहाडी आवाजाने, ‘पयलं नमन.. हो पयलं नमन..’ या नमनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर गण आणि त्यानंतर झालेल्या ‘कान्हा वाजवी बासुरी..’ या गवळणाने रसिकांची पाऊले थेट मंचावरच थिरकायला सुरुवात झाली. यानंतर उत्तरोत्तर कार्यक्रमात बहार यायला सुरुवात झाली. बहिणाबाईंच्या ओव्या, ग्रामसंस्कृती जागवणारी लोकगीते, दिंडी –वारकरी गीताने अख्या रसिकांना डोलायला लावलं. शाहीर श्री. उमप हे थेट रसिकांमध्ये उतरले. समस्त उपस्थितांमधून विठ्ठल नामाचा गजर आणि त्याच्या जोडीला टाळ्या यांनी वातावरण भारुन गेले होते. ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो..’ ‘लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला..’ या ठाकर गीतावरील नृत्यांने आणि यानंतर तमाम महाराष्ट्राच्या लाडक्या लावणीने रसिकांना अक्षरश: वेड लावले. शिट्या-टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पहायला मिळाला. ढोलकीवरील थाप, ताल आणि त्याच्या जोडीला उपस्थितीत प्रेक्षकांकडून मिळाणाच्या टाळ्यांची लयबद्धता यांची जुगलबंदीने बराच वेळ रंगत आणली होती. गीत, संगीत, नृत्य, गायन, वादन, सोंगी भजन, भारुड आदी कलाविष्कारांनी उपस्थितांना मोहिनी घातली होती. ‘छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय महाराष्ट्र काय.. देशही पूर्ण होऊ शकत नाही. !’ अशा राजांच्या जीवनातील शिवप्रताप दिन पोवाडा म्हणून या कार्यक्रमाची सांगता होत असतानाच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साकारलेल्या पात्राने स्वराज्याच्या उभारणीत अठरापगड जाती, रोहिले, मुस्लीम मावळ्यांचा सहभाग घेतल्याचा आवर्जून उल्लेख केला. शीवाय आजही तंतोतंत लागू पडणारा ‘जाती-धर्माचं सोवळं आपण जाळलं तरच स्वराज्य उजळेल..!’ हा मौलिक संदेश यावेळी दिला.www.konkantoday.com




